अग्निशामक केंद्र उभारावे
By admin | Published: April 25, 2017 04:19 AM2017-04-25T04:19:35+5:302017-04-25T04:19:35+5:30
वडगावशेरी-चंदननगरचा झपाट्याने झालेला विकास पाहता नगर रोडवर अग्निशामक दलाचे केंद्र असणे ही काळाची गरज बनली आहे.
चंदननगर : वडगावशेरी-चंदननगरचा झपाट्याने झालेला विकास पाहता नगर रोडवर अग्निशामक दलाचे केंद्र असणे ही काळाची गरज बनली आहे.
खराडी, विमाननगर, कल्याणीनगर, वडगावशेरी नागरीकरण, औद्यागिकीकरण अतिशय झपाट्याने वाढले आहे अन् ते वाढतच चालले असून, या भागासाठी स्वतंत्र अग्निशामक दलाचे केंद्र नाही.
या भागात मोठमोठे मॉल, आयटी कंपन्या, खराडी एमआयडीसी आहे. नगर रोडवरील मॉलला आग लागण्याच्या घटना काही महिन्यांपूर्वी घडल्या आहेत. पण अग्निशामक दलाचे बंब मात्र उशिरा पोहोचण्याचे प्रकार झाले. सध्या येरवडा येथे अग्निशामक दलाचे केंद्र आहे. तसेच चंदननगर, विमाननगर, वडगावशेरी ही लोकवस्तीची मोठी नगरे आहेत. आग लागल्यानंतर बंब उशिरा पोहोचतात. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. तर वडगावशेरीमध्ये ही आग लागण्याचे अनेक मोठे प्रकार घडले आहेत. वडगावशेरीसाठी येरवड्यातून येण्यास अधिक वेळ लागतो. हा विचार करून येथे अग्निशामक केंद्र गरजेचे आहे.
वडगावशेरी-कल्याणीनगर प्रभाग क्र. ५मध्ये रामवाडीतील पाणीपुरवठा केंद्रालगतच मोठा भूखंड हा अग्निशामक केंद्रासाठी आरक्षित आहे. मात्र येथील लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने हे अग्निशामक दलाच्या केंद्र उभारणीचे आरक्षण विकसित करण्यात आलेले नाही. तसेच अनेक ठिकाणी अनेक आरक्षित जागा आहेत, त्या धूळखात पडून आहेत. (वार्ताहर)