वापराविनाच फायर बुलेट!
By Admin | Published: May 4, 2015 03:23 AM2015-05-04T03:23:29+5:302015-05-04T03:23:29+5:30
अग्निशामक दलाने मोठा गाजावाजा करून खरेदी केलेल्या ६ फायर बुलेट, फोम टेंडर गाडीचा खरेदी केल्यापासून एकदाही वापर करण्यात आला
पुणे : अग्निशामक दलाने मोठा गाजावाजा करून खरेदी केलेल्या ६ फायर बुलेट, फोम टेंडर गाडीचा खरेदी केल्यापासून एकदाही वापर करण्यात आला नसल्याची माहिती उजेडात आली आहे. दलातील फायर गाड्यांची अवस्था दिवसेंदिवस खराब होत असताना त्यांची खरेदी
करण्याऐवजी, आवश्यकता नसलेल्या सामग्रीची खरेदी केली जात आहे, ती धूळखात पडून आहे.
शहराच्या अग्निशामक दलामध्ये २४ फायर गाड्या, ५ टँकर, ४ स्काय लिफ्ट, १ फोम टेंडर, ६ फायर बुलेट, ३ अॅम्बुलन्स, २ वॉटर मिस गन, ६ बोटी असा ताफा आहे. शहराच्या आप्तकालीन व्यवस्थेचा भार अग्निशामक दलावर असल्याने अंदाज पत्रकामध्ये दलासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येते; मात्र त्या निधीतून अनावश्यक खरेदी होत असल्याचे समोर आले आहे. अग्निशामक दलाने ४ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ६ फायर बुलेटचा वापर एकदाही आगीच्या कॉलसाठी केलेला नाही. तसेच, ८ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेली फोम टेंडर गाडीही वापराविना पडून आहे. लोकहित फाउंडेशनचे अजहर खान यांना मिळालेल्या माहितीतून उजेडात आले आहे. (प्रतिनिधी)