जनजागृतीमुळे आगीवर नियंत्रण
By admin | Published: October 23, 2014 05:06 AM2014-10-23T05:06:32+5:302014-10-23T05:06:32+5:30
अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गेल्या काही वर्षांपासून वर्षभर विविध उपक्रमांतून आणि प्रात्याक्षिकातून केलेल्या जनजागृतीला आता यश येऊ लागले
पुणे : अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गेल्या काही वर्षांपासून वर्षभर विविध उपक्रमांतून आणि प्रात्याक्षिकातून केलेल्या जनजागृतीला आता यश येऊ लागले असून, शहरात दिवाळीच्या सुमारास घडणाऱ्या आगींच्या घटनांमध्ये घट होऊ लागली आहे़ काही वर्षांपूर्वी लक्ष्मीपूजनाला एकाच रात्री शहरात ५५ आगीच्या घटना घडल्या होत्या़ त्यात घट होऊन गेल्या वर्षी दिवाळीत केवळ दोन घटना घडल्या होत्या़
लक्ष्मीपूजनानंतर शहरात मोठ्या प्रमाणावर फटाके वाजविले जातात़ विशेषत: व्यापारी पेठांमध्ये याचे प्रमाण मोठे असते़ रस्त्यावर उडविलेल्या जाणाऱ्या या फटाक्यांमुळे आगीच्या घटना घडतात़ पेटते बाण गच्चीतील भंगार सामानावर पडल्याने, कचराकुंडीत पडल्याने आगी लागण्याच्या घटना घडल्या आहेत़ काही वेळा झाडांवर बाण अडकल्याने झाडाने पेट घेतल्याचे दिसून आले आहे़
याबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले की, अग्निशामक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्षभर शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, व्यावसायिक संस्था, सोसायट्या येथे जाऊन प्रात्याक्षिके सादर करतात़ आपल्या संस्थेमध्ये असलेली आगप्रतिबंधक उपकरणे कशी हाताळावीत याची माहिती दिली जाते़ शहरातील मॉलमध्ये आग लागल्यास त्यावर कशी उपाययोजना करायची, याची प्रात्याक्षिके सादर केली जातात़ अतिशय गजबजलेला परिसर असलेल्या तुळशीबागेतील व्यापाऱ्यांना प्रात्याक्षिके दाखविण्यात आली होती़ (प्रतिनिधी)