आगप्रतिबंधक यंत्रणा धूळ खात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2016 01:06 AM2016-01-21T01:06:39+5:302016-01-21T01:06:39+5:30

शहरातील सोळाशे सोसायट्यांपैकी केवळ साडेचारशे सोसायटीधारकांनी आगप्रतिबंधक यंत्रणेची तपासणी केल्याची माहिती पुढे आली आहे.

Fire-control systems eat dust | आगप्रतिबंधक यंत्रणा धूळ खात

आगप्रतिबंधक यंत्रणा धूळ खात

Next

सचिन देव,  पिंपरी
शहरातील सोळाशे सोसायट्यांपैकी केवळ साडेचारशे सोसायटीधारकांनी आगप्रतिबंधक यंत्रणेची तपासणी केल्याची माहिती पुढे आली आहे. अनेक सोसायट्यांनी नावापुरती अग्निशमन यंत्रणा बसविल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे.
बांधकाम व्यावसायिकांना गृहप्रकल्प बांधताना त्या इमारतीमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा बसविणे अग्निशामक विभागाने सक्तीचे केले आहे. अन्यथा परवाना दिला जात नाही. बांधकाम परवाना देतेवेळी व्यावसायिकांकडून ही यंत्रणा बसविण्यासंबंधी ए फॉर्मही भरून घेतला जातो. त्यानंतरच परवानगी दिली जाते. इमारतीत ही यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दर सहा महिन्यांनी या यंत्रणेची तपासणी करणे सोसायटीधारकांना बंधनकारकही करण्यात आले आहे. पंधरा मीटर उंचीच्या वर बांधकाम असणाऱ्या इमारतींमध्ये मुंबई महापालिका अधिनियम २००९नुसार आगप्रतिबंधक यंत्रणा बसविणे बंधनकारक केले आहे. त्याशिवाय बांधकाम व्यावसायिकांना पूर्णत्वाचा दाखल दिला जात नाही. तशी कायद्यात तरतूद आहे. बांधकाम परवाना देताना व्यावसायिकांकडून अग्निशामक विभागाने आग प्रतिबंधक यंत्रणा बसविण्यासंदर्भात ए फार्म भरून घेतल्यानंतरच परवाना दिला जात आहे. बांधकाम व्यावसायिक या नियमानुसार इमारतीमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणाही बसवितात. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बहुतांश व्यावसायिक इमारतीमधील सदनिकांची विक्री करतात. त्यानंतर खरेदी केलेल्या सदनिकाधारकांवरच सदनिकेची दुरुस्तीसह तेथे बसविलेल्या आग प्रतिबंधक यंत्रणेची सहामाही तपासणी करून घेण्याची जबाबदारी आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात २००८पासून पंधरा मीटरहून अधिक उंचीच्या सोळाशे इमारती उभ्या आहेत. या सर्वांना सहामाही तपासणी करणे बंधनकारक केले आहे.
बांधकाम पूर्ण झाल्यानंतर व्यावसायिकांकडून इमारतीचा ताबा सोसायटीकडे जात असल्याने देखभाल दुरुस्तीची जबाबदारी त्यांच्यावर येते. महापालिकेच्या अग्निशामक विभागातर्फे शहराच्या विविध भागांतल्या सोसायटींमधील आगप्रतिबंधक यंत्रणेची तपासणी खासगी एजन्सीमार्फत करून घेण्यात येते. त्यात फायर पंप व पाइपलाइनची तपासणी, आग लागल्यावर पाणी वरपर्यंत चढविणारी वेट रायजर यंत्रणा सुस्थितीत आहे का आदी तपासण्या या एजन्सीमार्फत केली जाते. यंत्रणा व्यवस्थित असल्याचा एजन्सीतर्फे देण्यात येणारा बी फॉर्म सोसायटीधारकांना अग्निशामक विभागाकडे द्यावा लागतो.
सोसायट्यांना नोटिसा पाठविणार
शहरातील बहुतांश सोसायटीधारकांनी गेल्या अनेक वर्षापासून आगप्रतिबंधक यंत्रणेची तपासणी केलेली नाही. इमारतीमध्ये आगप्रतिबंधक यंत्रणा असूनही सहामाही तपासणी करण्याकडे सोसायटीधारकांनी दुर्लक्ष केलेले आहे. जर एखाद्या उंच इमारतीत भीषण आगीची परिस्थिती उद्भवल्यास आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तेथील यंत्रणेचा उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळे अग्निशामक विभागाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर यंत्रणेची सहामाही तपासणी वेळेवर केली, तर त्या यंत्रणेचा वेळेवर उपयोग होतो. प्रत्येक सोसायटीधारकांनी नियमानुसार सहामाही तपासणी करणे बंधनकारक आहे. कायद्यात दंडात्मक कारवाईचीही तरतूद आहे.
...तर विमा मिळणे अशक्य
आग लागून दुर्घटना घडल्यास विमा कंपनी प्रथम त्या शाळेतील सुरक्षा यंत्रणेवर लक्ष केंद्रित करते. शाळेत अग्निशमन यंत्रणा नसल्यास विम्याचा क्लेम करणाऱ्या कंपनीतर्फे विचारणा करण्यात येते, तसेच विमा मंजुरीत अडचणी येतात. शाळा-महाविद्यालयांमध्ये अग्निशमन यंत्रासोबतच वाळूने भरलेल्या बादल्या, पाण्याची पुरेशी सोय, स्मूक डिटेक्टर, हिट डिटेक्टर, फायर हायड्रंट सिस्टीम्स लावणे बंधनकारक आहे; अन्यथा कायदेशीर कारवाई होऊ शकते. पालकांनीसुद्धा सतर्क राहणे गरजेचे आहे.
- किरण गावडे, अग्निशामक अधिकारी,
पिंपरी-चिंचवड महापालिका अग्निशमन दल
४हॉटेल, बार-लॉजिंग, मॉल, सिनेमागृहे या व्यावसायिक इमारतींनाही अग्निशामक यंत्रणेची वर्षातून एकदा तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र, काही व्यावसायिकांनी मागील वर्षी तपासणी केलेली नाही. तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्यांमध्ये रुग्णांची संख्या मोठी आहे. ३५ रुग्णालयांपैकी १२ जणांनी तपासणी केलेली नाही. तसेच २१ हॉटेलपैकी ८, १२ मॉलपैकी - ७, २३ व्यावसायिक संकुलधारक ८ या मोठ्या व्यावसायिकांनी वर्ष उलटूनही अद्याप तपासणी केलेली नाही.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे केले जातेय दुर्लक्ष
अतुल क्षीरसागर, रावेत
अनेक शाळा- महाविद्यालयांनी अग्निशमन यंत्रणेचा केवळ शो-पीस म्हणूनच वापर केला आहे. या यंत्रणेतील गॅस टिकण्याबाबत मुदत स्पष्टपणे नोंदवलेली असते. मात्र, मुदत संपल्यानंतरही अग्निशमन यंत्रात ‘गॅस रिफिलिंग’ केलेला आढळला नाही. या यंत्रणेची तपासणी व्यवस्थापनासह अग्निशामक दलाकडून केली जाते. मात्र, अद्याप या यंत्रणेची तपासणी अनेक ठिकाणच्या शाळा व महाविद्यालयांत झालेली नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची कोणालाही पर्वा नसल्याची धक्कादायक स्थिती अनेक शाळांमध्ये आढळून आली.
रिफिलिंगकडे दुर्लक्ष
शहरातील व ग्रामीण भागातील १५ शाळा, महाविद्यालयांची प्रातिनिधिक स्वरूपात पाहणी केली असता सात शाळांतील अग्निशमन यंत्रातील गॅस कालबाह्य आढळला. त्यात महापालिकेच्या १, जिल्हा परिषदेची एक, तर खासगीच्या पाच शाळांचा समावेश आहे. दोन महाविद्यालये व चार शाळांमधील यंत्रामध्ये मुदतीच्या आत गॅस रिफिलिंग झालेले आहे.
कामचलाऊ प्रशिक्षण
अग्निशमन यंत्रणेसंदर्भात संबंधित शाळा-महाविद्यालयांचे प्रशासन, तसेच त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारे अधिकारीदेखील सतर्कता बाळगत नाहीत. अनेक शाळांमध्ये तर या यंत्राचा वापर बंधनकारक आहे, हेदेखील माहीत नाही. या यंत्राची देखभाल, हाताळणीबाबतही कोणालाच शास्त्रशुद्ध ज्ञान नाही. प्रत्येक शाळा व महाविद्यालयात शासनाच्या आदेशानुसार केवळ कागदावरच आपत्कालीन व्यवस्थापन समिती आहे. प्रत्यक्षात यामध्ये समाविष्ट असणाऱ्या काही सदस्यांनासुद्धा याबाबत पूर्ण माहिती नाही, अथवा प्रशिक्षणसुद्धा दिले गेले नाही. ज्यांना प्रशिक्षण दिले गेले आहे, तेसुद्धा केवळ कामचलाऊ आहे.
तपासणीकडे दुर्लक्ष
आयएसओ नामांकन २००२ या नियमानुसार अग्निशमन यंत्राची दरमहा तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र, सहा महिन्यांनंतरही यंत्राची तपासणीच केली जात नाही. गॅसची वर्षभराची एक्स्पायरी डेट असते. एका वर्षाने गॅस बदलणे आवश्यक आहे; परंतु अनेक ठिकाणी चार-पाच वर्षांनी अधिकाऱ्यांनी विचारणा केली, तरच संबंधित प्रशासनास जाग येते. आॅडिटमध्ये त्रुटी निघू शकते. या यंत्रावर रिफिलिंग डेट (पुनर्भरण) व ड्यू डेटचे (एक्स्पायरी डेट) स्टिकर असते; पण असे स्टिकर यंत्रावर आढळले. परंतु, त्यावरील मजकूर काहीच दिसत नाही, हे विशेष! देखभालीबाबत निष्काळजीपणा झाल्यास स्फोट होण्याची शक्यता अधिक असते.
सतर्कता बाळगणार
महापालिकेच्या शाळा विविध इमारतींमध्ये भरतात. त्या ठिकाणी अग्निशमन यंत्रे लावण्यात आली आहेत. वेळोवेळी पुनर्भरण व तपासणी, दुरुस्तीसंदर्भात संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत; परंतु ज्या ठिकाणी मुख्याध्यापक, प्रशासनाचे दुर्लक्ष झालेले असेल, तेथील सविस्तर माहिती घेण्यात येईल. सर्व यंत्रांचे पुनर्भरण, तपासणी व आवश्यक असणाऱ्या यंत्रांची दुरुस्ती करण्यात येईल.
- आशा उबाळे, प्रशासन अधिकारी,
मनपा शिक्षण मंडळ
औपचारिकता म्हणून पाहू नये
अग्निशामक यंत्रणा शाळा महाविद्यालयात केवळ औपचारिकता न राहता संबंधित शाळा महाविद्यालयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व यंत्रणा हाताळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याला वापरासंबंधी पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. या यंत्रणेकडे वेळोवेळी शालेय प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे.
- नाना शिवले, उपसभापती, मनपा शिक्षण मंडळ
येथे यंत्रणा अपडेट
४न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, हिंजवडी (चार यंत्रे), न्यू इंग्लिश स्कूल, मारुंजी (एक यंत्र), महापालिका शाळा वाल्हेकरवाडी (चार), ताराबाई शंकरलाल मुथा कन्या विद्यालय, चिंचवड (चार ), फत्तेचंद जैन विद्यालय चिंचवड (सात) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माण (चार) या शाळा व महाविद्यालयात मुदतीत गॅस पुनर्भरण (रिफिलिंग) करण्यात आलेले आढळले. मात्र, न्यू इंग्लिश स्कूल माण व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिंजवडी या ठिकाणी प्रत्येकी एक यंत्र उपलब्ध आहे. परंतु, ‘गॅस रिफिलिंग’ केलेला आढळला नाही.

Web Title: Fire-control systems eat dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.