नऱ्हेत शॉर्टसर्किटमुळे आग; 3 घरे भस्मसात
By admin | Published: August 31, 2015 03:51 AM2015-08-31T03:51:42+5:302015-08-31T03:51:42+5:30
भाटघर धरणाच्या काठावर असलेल्या नऱ्हे गावात शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन घरे जळाली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. आगीत घरातील धान्य,
भोर : भाटघर धरणाच्या काठावर असलेल्या नऱ्हे गावात शॉर्टसर्किटमुळे आग लागून तीन घरे जळाली. ही घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. आगीत घरातील धान्य, कपडे, किमती वस्तू तसेच रोख रक्कम असे एकूण १५ ते २० लाखांचे नुक सान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही.
नऱ्हे गावातील अंकुश लक्ष्मण वीर, नामदेव गणपती वीर व कुंडलिक धोंडिबा वीर या तिघा जणांची एकमेकांना लागून घरे आहेत. शनिवारी रात्री २ वाजता वीज गेली होती. ती पुन्हा परत आल्यावर शॉर्टसर्किट होऊन घराच्या माळ्यावरील गोवऱ्या जळाल्याने आग लागली. धुरामुळे घरातील लहान मुलाला व लहू वीर यांना जाग आली. त्यांना आग लागल्याचे लक्षात आले. तातडीने घरामधील तसेच आजूबाजूच्या घरातील लोकांना बाहेर काढत त्यांनी गावकऱ्यांना आग विझवण्यासाठी मदत मागितली. मात्र, आग मोठी असल्याने घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली. यामुळे आग विझवण्यात अडचणी येत होत्या. सासवड व पुणे येथून दोन आगीचे बंब पहाटे साडेचार वाजता आले. तोपर्यंत चार खोल्या जळून खाक झाल्या होत्या.
या घटनेत नामदेव वीर यांच्या घरात शेतीची कागदपत्रे, सोन्याचे गंठण, १० हजार रोख, ३ पोती गहू, २ पोती तांदूळ, ५ पोती शेंगा, पाण्याची मोटार, ४० साड्या व कपडे, किमती वस्तू असे ७ लाखांचे नुकसान झाले. अंकुश वीर व कुंडलिक वीर यांचे १० पोती तांदूळ, दोन पोती गहू, ४ खाटा, बॅरल, भांडी, कपडे, ५ हजार रोख, किमती वस्तू जळून सुमारे १२ लाखांचे नुकसान झाले. तिघांचे मिळून एकूण १५ ते २० लाखांचे नुक सान झाले आहे. सर्व संसारोपयोगी वस्तू आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने नुकसानभरपाईची मागणी दुर्घटनाग्रस्त कुटुंबांनी केली आहे. दरम्यान, नायब तहसीलदार धनंजय जाधव यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. महिला बालकल्याण सभापती वंदना धुमाळ, माजी उपसभाती अमोल पांगारे यांनी गावात येऊन कुटुंबांची भेट घेऊन घराची पाहणी केली. (वार्ताहर)