पुण्यात हेल्मेटच्या दुकानाला आग, सर्व हेल्मेट जळून खाक; दोन दुकानं सोडून होतं फटाक्याचं दुकान!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 10:28 PM2021-03-07T22:28:16+5:302021-03-07T22:40:19+5:30
पुणे-सोलापूर रस्त्यावरील एआयपीटी समोर असलेल्या दुकानांमधील दिपक हेल्मेट दुकानाला रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली.
वानवडी : पुणे-सोलापूर रस्त्यावरील एआयपीटी समोर असलेल्या दुकानांमधील दिपक हेल्मेट दुकानाला रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीत दुकानातील सर्व हेल्मेट जळून खाक झाले असून कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आग लागल्यानंतर हडपसर येथील अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यास सुरुवात झाली. त्यादरम्यान कोंढवा व कँन्टोमेंट भागातूनही अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पंधरा ते वीस मिनिटामध्ये आगीवर नियंत्रण मिळवता आले व कोणतीही जीवीतहानी न झाल्याचे अग्निशमन दलाचे हडपसर स्टेशन ड्यूटी अधिकारी शिवाजी चव्हाण यांनी सांगितले.
दुकानासमोर दोन ते तीन चारचाकी वाहने होती. वाहने मागच्या बाजूने थोड्या प्रमाणात जळाली. आग लागली त्या दुकानाच्या दोन दुकाने सोडून फटाक्याचे दुकान आहे. वेळीच अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. आगीचे कारण समजले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सोलापूर रस्त्यावर आग पहाणाऱ्यांची गर्दी वढल्याने वाहतुक कोंडी झाली होती. वानवडी वाहतुक पोलीस विभागाने घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली.