Video : पुणे- सोलापूर महामार्गावरील हॉटेल कांचनला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 05:06 PM2021-06-01T17:06:00+5:302021-06-01T17:20:51+5:30
यवत येथील कांचन हॉटेलला लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
पुणे : पुणे- सोलापुर महामार्गावर यवत गाव येथे असणाऱ्या हॉटेल कांचनला आज (दि. १) दुपारी भीषण आग लागली. पीएमआरडीए, एमआयडीसी व दौंड येथील अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यात आली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. आत्ता कुलिंग करण्याचे काम सुरू आहे.
पुणे सोलापूर महामार्गलगत असलेल्या यवत येथील प्रसिद्ध "कांचन व्हेज" हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत मुख्य इमारतीमधील विविध साहित्य, वस्तू जळून खाक झाल्या. आज (दि.१) रोजी दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान हॉटेलच्या गॅस ठेवलेल्या भागात आग लागली काही क्षणात हॉटेलची मुख्य इमारत व किचनमध्ये आग पसरली आगीत लाखो रुपयांचे साहित्य जाळून खाक झाले.
महामार्गालगत असलेल्या कांचन हॉटेल मध्ये आग लागल्याचे समजताच यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.स्थानिकांनी व हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.मात्र, आग आटोक्यात आली नाही.अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते.मात्र अर्धा तास उलटल्यानंतर देखील अग्निशामक दल घटनास्थळी आले नव्हते.यामुळे आगीत अर्ध्या तासात संपूर्ण इमारती मधील लाकडी फर्निचरचे साहित्य व गवताळ भाग जाळून खाक झाला.
पुणे- सोलापूर महामार्गावरील प्रसिद्ध हॉटेल 'कांचन'ला भीषण आग#pune#firepic.twitter.com/2xmBFUElgD
— Lokmat (@MiLOKMAT) June 1, 2021
चार वाजण्याच्या सुमारास कुरकुंभ येथील अद्योगिक वसाहत , दौंड नगरपरिषद व पीएमआरडीए चे अग्निशामक बंब दाखल झाले यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी गॅस गळती झाल्याने आग लागल्याचे प्राथमिक अंदाज घटनास्थळी व्यक्त केले जात होते.
यवत येथील कांचन हॉटेलच्या आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीची भीषणता इतकी होती की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तीन ठिकाणच्या अग्निशामक दलाच्या गाडयांना पाचारण करावे लागले. काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझविण्यात यश आले. मात्र या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.