पुण्यात बोहरी आळीत दुकानामध्ये आग; अग्निशमन दलाकडून आगीवर नियंञण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 01:46 PM2024-04-22T13:46:13+5:302024-04-22T13:46:37+5:30
४ फायरगाड्या व १ वॉटर टँकरच्या मदतीने जवानांनी तासाभरात आगीवर नियंत्रण मिळवले
पुणे: रविवार पेठेतील बोहरी आळीत रामसुख चेंबर्स येथे आज पहाटे आग लागल्याची घटना घडली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून मुख्यालय, नायडू, कसबा, गंगाधाम येथून एकुण ४ फायरगाड्या व १ वॉटर टँकर रवाना करण्यात आल्या होत्या. जवानांनी एका तासात आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रामसुख चेम्बर्सच्या इमारतीत तळमजल्यावर दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीत किंवा दुकानामध्ये कोणी अडकले आहे का? याची खाञी करुन चारही बाजूने आगीवर पाण्याचा मारा सुरू केला. दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात मालाचा (ग्रॉसरी) साठा असल्याने व आजुबाजूला इतर दुकाने व रहिवाशी घरे असून आग इतरञ पसरु नये याची दक्षता घेतली गेली. जवानांनी सुमारे तासाभरात आगीवर नियंञण मिळवत धोका दुर केला. घटनास्थळी आगीचे नेमके कारण समजले नसून सदर ठिकाणी सुदैवाने कोणीही जखमी नसल्याचे दलाकडून सांगण्यात आले आहे.
अग्निशमन अधिकारी विजय भिलारे, पंकज जगताप, सुनिल नाईकनवरे तसेच वाहनचालक संदिप कर्णे, दत्तात्रय वाघ, अनिकेत ओव्हाळ, संदिप थोरात व जवान भाऊसाहेब चोरमले, भरत वाडकर, चंद्रकांत गावडे, आझीम शेख, दिगंबर बांदिवडेकर, गणेश कुंभार, गणेश लोणारे, संतोष अडाळगे, निकेतन पवार, अजय कोकणे, रिजवान फरास, रोहित मदनावाले, पंकज पाटील, अक्षय कांबळे यांनी सहभाग घेतला.