पुणे - उद्योजक बालाजी राव यांच्या पाषाण येथील बंगल्याच्या भटारखानाला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2018 11:05 AM2018-01-13T11:05:14+5:302018-01-13T11:05:23+5:30
पाषाण येथील नॅशनल सोसायटी मधील बंगला क्रमांक 104 मधील भटरखानाला आग लागून त्यात सर्व साहित्य जळून खाक झाले
पुणे: पाषाण येथील नॅशनल सोसायटी मधील बंगला क्रमांक 104 मधील भटरखानाला आग लागून त्यात सर्व साहित्य जळून खाक झाले. हा बंगला उद्योजक बालाजी राव यांचा आहे. याबाबत अग्निशामक दलाकडून दिलेल्या माहितीनुसार, बंगल्याला लागून 50 बाय 30 चे पत्र्याचे शेड उभारण्यात आले होते. त्यात फ्रिज, ओव्हन, तंदूर भट्टी होती. पहाटे 4 वाजून 40 मिनिटांनी कॉल आला होता. त्यानंतर तातडीने 2 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या, तोपर्यत आग खूप भडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून 1 तासात ही आग विझवली.
या आगीची धग इतकी मोठी होती की या भटरखान्यातील अनेक वस्तू वितळून गेल्या. सकाळी 5. 50 वाजता आग पूर्णपणे विझविण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजले नाही.
शहरात कोठेही आग लागली तर त्याची माहिती सर्व प्रथम माहिती लोक अग्निशमन दलाच्या 101 वर फोन करून देतात, पण या घटनेची माहिती कोणीही 101 ला दिली नाही. आग लागल्यानंतर उशिराने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती मिळाली. त्यानंतर तिथून अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी गेले, तेव्हा तेथे 15 ते 20 कर्मचारी होते. त्यांच्यापैकी काहींनी अग्निशमन दलाच्या जवानांना शिवीगाळ ही केली, तरीही त्यांनी आपले काम चोख बजावले. या प्रकाराची माहिती बालाजी राव यांना मिळाल्यावर त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिका-यांची भेट घेऊन झाल्या प्रकारची दिलगिरी व्यक्त केली.