कोथरुड कचरा डेपोला तीन दिवसांपासून आग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 10:12 PM2018-10-13T22:12:02+5:302018-10-13T22:15:43+5:30
गेल्या तीन दिवसांपासून कोथरूड परिसरातील कचरा डेपोतील आग धुमसत आहे.
पुणे: गेल्या तीन दिवसांपासून कोथरूड परिसरातील कचरा डेपोतील आग धुमसत आहे.अग्निशामक विभागाच्या कर्मचा-यांचे शनिवारी रात्री उशीरापर्यंत ही आग विझवण्याचे काम सुरू होते.सुमारे साडेचार एकर परिसरात आग पसरल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती.
पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसात पावसामुळे झाड पडीच्या घटना घडल्या होत्या.तसेच पालिका प्रशासनातर्फे धोकादाय झाडांच्या फांद्या तोडण्यात आल्या आहेत.या झाडांच्या फांद्याचे ढीक कोथरूड कचरा डेपो परिसरात टाकण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून या फाद्यांच्या ढीगांना आग लागत आहे.अग्निशामक विभागाच्या कर्मचा-यांनी ही आग विझविली होती. मात्र, पुन्हा शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या फाद्यांना आग लागली. त्यामुळे सकाळी 11 वाजल्यापासून रात्री उशीरापर्यंत अग्निशामक विभागाच्या जवानांकडून आग विझवण्याचे काम सुरू होते.
अग्निशामक विभागाचे गजानन पाथरूडकर म्हणाले, झाड्यांच्या फाद्यांचे सुमारे 10 फुटांचे 15 ते 20 ढीग या ठिकाणी पडलेले आहेत.या ढीगांना दोन दिवसांपूर्वी आग लागली होती. ही आग विझविण्यात आली होती. मात्र,या परिसरात मोठ्या प्रमाणावर राख साचलेली आहे. तसेच अर्ध्या जळालेल्या फांद्यांवर माती टाकून पुन्हा त्यावर पाणी टाकावे लागते. त्यामुळे आग विझविण्यास वेळ लागत आहे. मात्र,सायंकाळी सात वाजल्यानंतर ही आग अधिकच पसरल्याचे दिसून आले.
पालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी दुपारी व रात्री उशीरा कचरा डेपोला लागलेल्या आगीची पहाणी केली.ही जागा मेट्रो प्रकल्पासाठी असून त्या ठिकाणी सातत आग लागत आहे.अगिशामकचे विभागीय अधिकारी सुनील गिलबिले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचा-यांकडून आग विझविण्याचे काम सुरू होते.