पुण्यातील वाघोली येथे मारुती सुझुकी सर्व्हिस सेंटरला आग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 09:12 AM2019-08-25T09:12:57+5:302019-08-25T09:13:24+5:30
पुण्यातील वाघोली येथील मारुती सुझुकी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला शनिवारी रात्री उशिरा आग लागली.
पुणे - पुण्यातील वाघोली येथील मारुती सुझुकी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला शनिवारी रात्री उशिरा आग लागली. आग मोठी असल्याने पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि आजूबाजूच्या एमआयडीसीचे बंब यांनी मिळून सुमारे दोन तासांनी ही आग विजवली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून प्राथमिक दृष्ट्या शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वाघोली येथील वाघेश्वर मंदिराच्या बाजूला मारुती सुझुकीचे साई सर्व्हिस स्टेशन आहे. रात्री 1वाजून 10 मिनिटांच्या सुमारास तिथे आग लागल्याची वर्दी येरवडा अग्निशामक केंद्राला मिळाली. त्यानंतर दोन गाड्या रवाना करण्यात आल्या. मात्र आगीचे स्वरूप बघता अजून गाड्या बोलवण्यात आल्या. सुमारे दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. सुदैवाने आतील गाड्या बाहेर काढण्यास वेळ मिळाला मात्र स्पेअर पार्ट मात्र जळून खाक झाले.