पुण्यात एमएनजीएलच्या पाईपलाईनला अाग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2018 02:02 PM2018-08-04T14:02:36+5:302018-08-04T14:03:42+5:30
पुण्यातील उंड्री भागात एमएनजीएलच्या पाईपलाईनला सकाळी अाग लागली. सुदैवाने या अागीत कुठलिही हानी झाली नाही.
पुणे : एमएनजीएलच्या गॅस पाईपलाईनला अाग लागल्याची धक्कादायक घटना पुण्यातील उंड्री भागात घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत अाग विझवली. तसेच एमएनजीएलचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले.
अग्निशमन दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील उंड्री भागातील अाहिरा मंत्रा प्राेजेक्ट लगत एमएनजीएलच्या गॅस पाईपलाईनला अाग लागल्याचा फाेन सकाळी 11.45 सुमारास अाला. तात्काळ अग्निशामन दलाच्या तीन फायर गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात अाल्या. अग्निशामन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत 20 ते 25 मिनिटांमध्ये अाग अाटाेक्यात अाणली. सुदैवाने अाग जास्त न पसरल्याने कुठलिही दुर्घटना घडली नाही. एमएनजीएलचे अधिकारीही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा अाढावा घेतला. '
दरम्यान, अनेकदा विविध कामांसाठी रस्ते खाेदण्यात येत असतात. रस्ता खाेदताना ही पाईपलाईन फुटली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत अाहे. परंतु अाग कशी लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही. ही पाईपलाईन कुठल्या इमारीत जात नसल्याने माेठा अनर्थ टळला.