कोथरुडचे मनसे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 03:43 PM2019-10-26T15:43:39+5:302019-10-26T15:58:28+5:30
ही घटना डहाणुकर कॉलनीतील पीएनजी शोरुमसमोर असलेले मनसे कार्यालयात २२ ऑक्टोबरला रात्री सव्वा नऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली़.
पुणे : मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोथरुडमधील डहाणुकर कॉलनीमधील मनसेचे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला़. कार्यालयाला लागलेली आग किरकोळ स्वरुपाची होती़. त्यात आतील फायबरचे शीट जळाले़. ही घटना डहाणुकर कॉलनीतील पीएनजी शोरुमसमोर असलेले मनसे कार्यालयात २२ ऑक्टोबरला रात्री सव्वा नऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली़.
या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी हेमंत रमेश संभुस (वय ४६, रा़ वंडर फ्युचुरा, कोथरुड) यांनी कोथरुड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, डहाणुकर कॉलनीत रोडच्या कडेला स्वयंभु प्रतिष्ठान व मनसेचे कार्यालय आहे़. हेमंत संभुस व त्यांचे सहकारी मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी कार्यालयात रात्री सव्वानऊपर्यंत थांबले होते़. ते कार्यालयातून निघून गेल्यानंतर कोणीतरी ते पटवून देण्याचा प्रयत्न केला़ परंतु, स्थानिक नागरिकांना हा प्रकार लगेच लक्षात आल्यावर त्यांनी व कार्यकर्त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला़. अग्निशामक दलाची गाडी तातडीने घटनास्थळी पोहचली व तिने आग पूर्णपणे विझविली़.
आगीमध्ये कार्यालयातील फायबरचे शीट जळाले आहे़. कोथरुड मतदारसंघात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि मनसेचे किशोर शिंदे अशी सरळ लढत होती़. मतदानामध्ये शिंदे यांना सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मतदानानंतर सर्वत्र सांगितले जात होते़. त्यातून कोणीतरी हे कार्यालय पेटविण्याचा प्रयत्न केला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. विधानसभेची मतमोजणी असल्याने त्यानंतर संभुस यांनी फिर्याद दिली आहे़. सहायक पोलीस निरीक्षक उमेश माळी अधिक तपास करीत आहेत.