मोडेप्रो कंपनीत आग : कुरकुंभची औद्योगिक सुरक्षा अधांतरीच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 12:21 AM2018-12-29T00:21:10+5:302018-12-29T00:21:26+5:30
कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पांत अपघाताच्या घटनांची मालिका सुरूच असून, परिसरातील कामगार व स्थानिक रहिवाशांची सुरक्षा आजही ...
कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील रासायनिक प्रकल्पांत अपघाताच्या घटनांची मालिका सुरूच असून, परिसरातील कामगार व स्थानिक रहिवाशांची सुरक्षा आजही धोक्यातच असल्याचे वास्तव चित्र वारंवार घडणाऱ्या छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनेतून अधोरेखित होत आहे.
प्रकल्प उभा करताना दिल्या जात असणाºया विविध परवानग्या या आर्थिक संबंधांतून निकष न तपासताच दिल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत असून, त्याबाबत इतक्या वर्षांपासून एकाही शासकीय अधिकाºयाने आपली भूमिका स्पष्ट मांडलेली दिसत नाही. एरवी एखाद्या मंत्र्याच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे अधिकारी अपघाताच्या वेळेस कुठे गायब असतात, याबाबत आजही प्रश्नचिन्ह आहे.
शुक्रवारी (दि. २८) सकाळी कुरकुंभ येथील मोडेप्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग जरी थोड्या प्रमाणात असली, तरी कंपनीकडे असणारी सुरक्षा यंत्रणा
मात्र त्या आगीला नियंत्रित करणारीदेखील नसल्याचे दिसत आहे. कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन आग विझवली. यामध्ये कोणालाही इजा झाली नाही; मात्र याघटनेतून असुरक्षितता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. मालकांकडे कंपनी उभी करण्यासाठी करोडो रुपये असतात. अनेकविध परवानग्या मिळविण्यासाठी खर्चदेखील भरमसाट केला जातो; मात्र सुरक्षेच्या बाबतीत उदासीनता का असते, हा प्रश्न येथील सर्वसामान्य कामगारांना नेहमीच पडत आहे.
दरम्यान, या औद्योगिक क्षेत्रात होणाºया अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून अनेक बैठकादेखील झाल्या आहेत. यामध्ये औद्योगिक क्षेत्राशी निगडितशासनाच्या विविध अधिकाºयांनी हजेरीदेखील लावलेली आहे. सुरक्षेच्या बाबतीत अनेकांना निर्देशदेखील देण्यात आले आहेत. मात्र, बैठका संपल्यावर परिस्थिती ‘जैसे थे’ होत असून दिलेल्या निर्देशांना केराची टोपली दाखवून कंपनी मालक व व्यवस्थापन वेळकाढूपणा करीत आहे.
त्यामुळे अधिकारी व व्यवस्थापन यांच्यामधील संबंध लपलेले नाहीत; परंतु या सर्वांच्या मध्ये येथील ग्रामस्थ व कामगार नेहमीच दुर्लक्षित होत आहे. रासायनिक प्रकल्प असूनदेखील अनेक कंपन्यांकडे स्वत:चे सुरक्षा अधिकारी नाहीत. परिणामी, प्रत्यक्षात काम करणाºया कामगारांना सुरक्षेबाबत काहीच माहिती नसते. थोड्याफार प्रमाणात असणाºया सुरक्षा उपकरणांना हाताळण्याची माहितीदेखील बºयाच अंशी कोणाला नसते. त्यामुळे घटना छोटी जरी असली, तरी कामगार भयभीत होतात. मात्र, याबाबत पुढाकाराने कोणीच लक्ष देत नाही.
औद्योगिक क्षेत्रासाठी नेमलेले शासकीय सुरक्षा अधिकारी नाममात्र अपघातानंतर येऊन जागेची पाहणी करून जातात. यापलीकडे दुसरे काहीच होत नसल्याचे आजवरच्या घटनांतून समोर येते.
बहुतांशी कंपन्यांकडे जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकादेखील नसते. त्यामुळे सर्व कारभार रामभरोसे असल्याचे निदर्शनास येते. मात्र, या छोट्या घटनेतूनच धडा घेऊन भविष्यातील मोठ्या दुर्घटना टाळणे सर्वांसाठी भल्याचे होईल, याची जाणीव वेळीच जबाबदार यंत्रणांनी घेणे आवश्यक आहे; अन्यथा मोठा अनर्थ घडण्यास वेळ लागणार नाही.