महावितरणच्या भंगाराला आग

By Admin | Published: April 18, 2017 02:34 AM2017-04-18T02:34:27+5:302017-04-18T02:34:27+5:30

येथील वीज वितरण कंपनीच्या शहर कार्यालयालगत असलेले जुने मीटर, बॉक्स, केबल व इतर स्क्रॅप साहित्याला अचानक आग लागल्याने सर्व साहित्य जाळून खाक झाले.

The fire of the MSEDCL | महावितरणच्या भंगाराला आग

महावितरणच्या भंगाराला आग

googlenewsNext

नारायणगाव : येथील वीज वितरण कंपनीच्या शहर कार्यालयालगत असलेले जुने मीटर, बॉक्स, केबल व इतर स्क्रॅप साहित्याला अचानक आग लागल्याने सर्व साहित्य जाळून खाक झाले. या आगीत सुमारे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना सोमवारी दुपारी ३. ३० वा. घडली. जुन्नर नगर परिषदेचा अग्निशामक दलाचा बंब वेळेवर आल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले.
नारायणगाव येथील वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयाच्या जवळ असणाऱ्या शहर कार्यालयाच्या पाठीमागे असणाऱ्या मोकळ्या पटांगणात दुपारी ३ वा.च्या सुमारास अचानक गवताने पेट घेतला. वीज कर्मचाऱ्यांनी ती आग झाडांच्या हिरव्या फांद्या तोडून विझवली होती. त्यानंतर दुपारी ३.३० च्या सुमारास अचानक शहर कार्यालयामागे जुने मीटर, बॉक्स, केबल व इतर स्क्रॅप साहित्य असलेल्या जागेत आग लागल्याचे एका कर्मचाऱ्याला दिसले. त्यांनी ही माहिती उपविभागीय अभियंता उमेश कर्पे यांना देऊन इतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु हवेचा वेग जास्त असल्याने तसेच गवत वाळले असल्याने आगीने तीव्र रूप धारण केले. कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी यांनी आग पाहताच कार्यालयातील संगणक, महत्त्वाच्या फाईली, इतर साहित्य कार्यालयाबाहेर काढण्यास सुरुवात केली. तसेच आगीपासून वाचण्यासाठी कर्मचारी कार्यालयाबाहेर आले. आग आटोक्यात आणणे शक्य न झाल्याने कर्पे तसेच कर्मचारी होले यांनी जुन्नर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाशी संपर्क करून माहिती दिली. अग्निशामक दलाचे राजू चव्हाण व त्यांचे सहकारी गाडी घेऊन अवघ्या १५ मिनिटांत घटनास्थळी आले. तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. चव्हाण यांनी सहकार्यांच्या मदतीने थोड्याच वेळात आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील घटना टळली. वीज वितरण कंपनीचे उपविभागीय अभियंता उमेश कर्पे म्हणाले, की आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. कार्यालयाच्या पाठीमागे कर्मचारी वसाहतीच्या जवळ मोठ्या प्रमाणात वाळलेले गवत आहे. दुपारी आग विझविण्यात आली होती पण परत त्यानंतर अचानक वाळलेल्या गवताने पेट घेतल्याने पुन्हा आग लागून ही घटना घडली आहे. (वार्ताहर)

Web Title: The fire of the MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.