बहुराष्ट्रीय कंपनीला आग
By Admin | Published: December 24, 2016 12:54 AM2016-12-24T00:54:11+5:302016-12-24T00:54:11+5:30
नऱ्हे येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारी ही कंपनी आगीमध्ये
पुणे : नऱ्हे येथील एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये शुक्रवारी मध्यरात्री भीषण आग लागली. इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणारी ही कंपनी आगीमध्ये जळून खाक झाली. या कंपनीचे पाच कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशामक दलाच्या जवानांनी सहा बंबांच्या साहाय्याने रात्रभर कष्ट घेऊन आग आटोक्यात आणली.
नऱ्हे येथे व्हिस्मार्ट थर्मोटेक प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. एका मोकळ्या जागेमध्ये साडेचार हजार चौरस फुटांच्या शेडमध्ये ही कंपनी उभारण्यात आलेली आहे.
इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच तापमान मोजण्याची विविध उत्पादने आणि इलेक्ट्रॉनिक सेन्सरसारखी उत्पादने येथे तयार केली जातात. या ठिकाणी कच्चा मालही मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आलेला होता. या कंपनीकडून विदेशामध्ये माल निर्यात केला जातो.
शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास कंपनीमध्ये आग लागली. माहिती मिळताच अग्निशामक दलाचे अधिकारी प्रभाकर उम्राटकर पथकासह घटनास्थळी दाखल झाले. सिंहगड व कात्रज अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्याचा मारा करायला सुरुवात केली.
आगीचे स्वरूप मोठे असल्यामुळे आणखी गाड्या बोलावण्यात आल्या. आगीवर पहाटेच्या सुमारास नियंत्रण मिळवण्यात यश आले. दुपारी बारा वाजेपर्यंत दलाचे जवान आग थंड करण्याचे काम करीत होते.
आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. केंद्रप्रमुख प्रभाकर उम्राटकर, जवान भारत पवार, भुजबळ, दुधाने व कात्रज केंद्राचे वसंत भिलारे, रमेश भिलारे, शाबीर शेख, नीलेश माने, राहुल नलावडे यांनी ही आग विझवली.(प्रतिनिधी)