प्लॅस्टिक कंपनीला आग
By admin | Published: April 15, 2016 03:34 AM2016-04-15T03:34:02+5:302016-04-15T03:34:02+5:30
कांदळी (ता. जुन्नर) येथील जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीमधील ओंकार प्लॅस्टिक इंडस्ट्रीजच्या दोन प्रकल्पामध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
नारायणगाव : कांदळी (ता. जुन्नर) येथील जुन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीमधील ओंकार प्लॅस्टिक इंडस्ट्रीजच्या दोन प्रकल्पामध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
औद्योगिक सहकारी वसाहतीतील विलास सखाराम बोऱ्हाडे यांच्या बी-१८ मधील ओंकार इंडस्ट्रीत प्लॅस्टिक दाणे; तसेच कागद बनविले जातात, तर रोहिणी एकनाथ बाम्हणे या बी-१४ मधील ओंकार प्लॅस्टिक इंडस्टीज ताडपत्री बनविले जाते. बुधवारी रात्री १०च्या सुमारास ओंकार इंडस्ट्रीजमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली. ही आग एवढी तीव्र होती की, शेजारील ओंकार प्लॅस्टिक इंडस्ट्रीज या कंपनीला ही आग लागल्याने दोन्ही कंपन्यांचे लाखो रुपयांचे प्लॅस्टिकचे साहित्य जळाले. आग लागल्याचे कळताच जुन्नर तालुका चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष अमित बेनके यांनी जुन्नर नगर परिषदेची अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी पाठवली; तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस विभागीय अधिकारी जयश्री देसाई, तहसीलदार आशा होळकर, सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, युवानेते अतुल बेनके यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
आग आटोक्यात आणण्यासाठी जुन्नर नगर परिषदेच्या अग्निशामक दलाचे राजकुमार चव्हाण, अतिब तिरंदाज, औद्योगिक सहकारी वसाहतीतील सचिव पडवळ आणि परिसरातील ग्रामस्थ, कामगार यांनी मध्यरात्री
३ पर्यंत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. आगीत सुमारे ३० ते ४० लाखांचे नुकसान झाले.