पुणे आरटीओ कार्यालयाच्या एका खोलीला आग; कागदपत्रांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2018 11:49 AM2018-06-13T11:49:31+5:302018-06-13T11:49:31+5:30
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील एका एक हजार फुटाच्या खोलीला सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली.
पुणे : बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ)पहिल्या मजल्यावरील एका खोलीला लागलेल्या आगीत वाहन नोंदणीची कागदपत्रे जळाली. अग्निशामक दलाला आगीची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत अवघ्या 15 मिनटांमध्ये आग आटोक्यात आणण्यात आली.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावरील एका एक हजार फुटाच्या खोलीला सकाळी साडेआठच्या सुमारास आग लागली. या खोलीत वाहनांच्या नोंदणीचे कागदपत्रे ठेवण्यात आले होते. या कागदपत्रांना आग लागल्याने मोठ्याप्रमाणात धूर खोलीतून येत होता. आगीची माहिती मिळताच दयाराम राजगुरू अग्निशामक दलाच्या 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. पाण्याचा मारा करत 15 मिनिटात आग नियंत्रणात आणण्यात आली. परिवहन कार्यालयापासून अग्निशामक केंद्र एका किलोमीटरच्या अंतरावर असल्याने अवघ्या दीड मिनिटांमध्ये अग्निशामकदलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याने मोठी दुर्घटना टळल्याची माहिती दयाराम राजगुरू अग्निशामक केंद्राचे स्टेशन ड्युटी ऑफिसर विजय भिलारे यांनी दिली.
वाहनांच्या नोंदणीचे कागतपत्रे या आगीत जळाले असले तरी त्याची नोंदणी संगणकावर केली असल्याने वाहनांच्या माहितीचे कुठलेही नुकसान झाले नसल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी लोकमतशी बोलताना दिली.