संगम कापड दुकानाची आग दुसऱ्या दिवशीही धुमसती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:09 AM2021-07-09T04:09:07+5:302021-07-09T04:09:07+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क राजगुरुनगर : संगम कापड दुकानाच्या चारमजली इमारतीला भीषण लागलेल्या आगीमध्ये जवळपास सहा कोटींचे नुकसान झाल्याचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : संगम कापड दुकानाच्या चारमजली इमारतीला भीषण लागलेल्या आगीमध्ये जवळपास सहा कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यातून समोर आला आहे.
तब्बल बारा तासांच्या प्रयत्नानंतर सहा बंबांसह अग्निशमन दलाच्या जवानांना आग आटोक्यात आणण्यात यश आले. बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास संगम कापड दुकानाच्या नूतनीकरण सुरू असलेल्या इमारतीला लागलेल्या आगीबाबत शहरासह तालुक्यात विविध चर्चा सुरु आहे.
गुरुवारी पहाटे ४.३० पर्यंत अग्निशामक दलाच्या सहा बंबांनी आग आटोक्यात आणण्यासाठी जवळपास ३२ बंब पाण्याचा मारा करावा लागला होता.
मात्र, तरी गुरुवारी दिवसभर इमारतीच्या ४ चौथ्या मजल्यावरची आग दिवसभर धुमसत होती. या आगीच्या दुर्घटनेत तिसरा आणि चौथा मजला खाक झाला तर टेरसवरील लिफ्ट आणि साठवलेले डिझेल जळून खाक झाले. जनरेटरही भस्मसात झाले. तर नवीन इमारतीतील चौथ्या मजल्याला ही याची मोठी झळ बसली तर पाण्याच्या माऱ्यामुळे दुसरा मजल्यात पाणी गळीत होऊन सर्वत्र पाणीच पाणी झाले. लाॅकडाऊन असूनदेखील सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामामुळे अखेर इलेक्ट्रिक काम सुरू असताना अनपेक्षित आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानासह राजगुरुनगर नगरपरिषदेच्या कर्मचारी आणि नागरिक व्यापारीवर्ग रात्रभर घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्य करण्यात आले.