कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील आग सत्र सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:11 AM2021-03-26T04:11:32+5:302021-03-26T04:11:32+5:30
-- कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील आग तांडवाच्या मालिकेत आणखी एक भर पडली आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट ...
--
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक क्षेत्रातील आग तांडवाच्या मालिकेत आणखी एक भर पडली आहे. औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक डी-२ मधील सम्राट पेपर मिलमधील पुठ्याच्या गोडाऊनला गुरुवार पहाटे चारच्या सुमारास आग लागली. त्यामध्ये संपूर्ण गोडाऊन जळून खाक झाले. या घटनेने कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील आग लागण्याची मालिका सुरूच राहिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील रायगड जिल्हा, नवी मुंबई व इतर ठिकाणातील रासायनिक प्रकल्पातून होणाऱ्या दुर्घटनांमधून काहीच बोध कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र घेताना दिसत नाही. वारंवार होणारे छोटे छोटे अपघात, स्फोट यांसारख्या घटना राजरोसपणे घडत आहेत. मात्र, यावर उपाय योजना शोधण्यासाठी काहीच यंत्रणा अस्तित्वात नसल्याचे आजवरच्या अनुभवातून दिसून येत आहे.
दरम्यान, पहाटे घडलेल्या या घटनेची माहिती कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रातील अग्निशामक दलाला कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग नियंत्रणात आली असली, तरी धुरांचे लोट दुपारपर्यंत दिसून येत होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कुरकुंभ पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले.
सम्राट पेपर मिलमध्ये सुरक्षेच्या कुठल्याही यंत्रणा कार्यरत नसल्याचे दिसून आले आहे. गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्तव्यस्त पडलेल्या पुठ्यांमुळे आगीचे प्रमाण वाढले.तर अग्निशामक दलाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्या देखील रिकाम्याच असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे कंपनी व्यवस्थापन सुरक्षेच्या दृष्टीने गांभीर्याने विचार करीत नसल्याचे दिसून येते.
--
फोटो क्रमांक : २५ कुरुकुंभ
फोटो ओळ : कुरकुंभ येथील सम्राट पेपर मिल मध्ये लागलेली आग