बिबवेवाडी येथे पत्र्यांच्या दुकानांना भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:23 AM2019-01-15T00:23:06+5:302019-01-15T00:23:26+5:30
सुदैवाने जीवितहानी नाही : गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भडका
बिबवेवाडी : येथील शिवतेजनगरशेजारील ओमकारनगर येथे मोकळ्या जागेत असलेल्या तीन पत्र्यांच्या दुकानांना सकाळी साडेसात वाजता भीषण आग लागून मालमत्तेचे मोठे नुकसान झाले. या वेळी सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
आग लागल्याची माहिती कळताच कात्रज केंद्र व कोंढवा केंद्रातून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या व देवदूत या आपत्ती व्यवस्थापनाच्या दोन गाड्या आल्यानंतर ही आग विझविण्यात आली. या वेळी अग्निशामक दलाचे तांडेल तळेकर व जवान जागडे, घडशी, मांगडे, लबडे, जरे, इंगळे व तांगुरे यांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग विझविली व परिस्थिती नियंत्रणात आणली.
बिबवेवाडी येथील ओमकारनगर येथील मोकळ्या जागेवर असलेल्या या दुकानामध्ये एक दुकान मसाला गिरणीचे, दुसरे लाकडी फळ्या कापण्याचे व तिसरे दुकान हे भंगारमालाचे होते. येथील नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे सकाळच्या वेळी लावलेल्या शेकोटीमुळे ही आग पसरली. भंगारमालाच्या दुकानाला लागली; त्यानंतर त्याच्याशेजारीच असलेल्या मसाला गिरणीच्या दुकानामध्ये आग पसरली व त्याच दुकानात असलेल्या गॅसच्या सिलिंडरचा स्फोट होऊन मोठा भडका उडाला. त्यानंतर लाकडी फळ्या कापण्याच्या दुकानाला लागली.
दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान
४या आगीमध्ये तिन्ही दुकाने जळून भस्मसात झाली आहेत. या आगीच्या दुर्घटनेत श्रीराम महिला लघु गृह उद्योग या मसाला गिरणीचे अंदाजे साडेआठ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे मसाला गिरणीचे मालक कसबे यांनी सांगितले. तसेच, चंद्रकांत प्लायवूड या लाकडी फळ्या कापण्याच्या कारखान्याचे अंदाजे नुकसान तीन लाख रुपये इतके झाले आहे, असे या दुकानाचे मालक चंद्रकांत जोगदंड यांनी सांगितले व भंगारमालाचे दुकान असलेल्या शफी मोमीन यांचे यामध्ये दीड लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.