पुणे- मुंबई रस्त्यावरच्या पाटील इस्टेटमधील झोपडपट्टीला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 02:27 PM2018-11-28T14:27:30+5:302018-11-28T14:34:26+5:30
पुणे- मुंबई रोडवरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी मोठी आग लागली असून अग्निशामक दलाकडून तेथे युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरु आहे़.
पुणे : पुणे- मुंबई रोडवरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये बुधवारी दुपारी मोठी आग लागली असून अग्निशामक दलाकडून तेथे युद्धपातळीवर आग विझविण्याचे काम सुरु आहे़. प्राथमिक माहितीनुसार, आतापर्यंत चार झोपड्या या आगीत जळून खाक झाल्या आहे़त. त्यात आता ६ ते ७ गॅस सिलेंडरचे स्फोट झाल्याने आगीचा आणखी भडका उडाला असून गर्दीमुळे अग्निशामक दलाच्या जवानांना काम करणे अवघड होत आहे.
पाटील इस्टेट झोपडपट्टीतील गल्ली नंबर ३ मधील एका झोपडपट्टीला दुपारी एक वाजून १० मिनिटांनी आग लागली़. या आगीची खबर मिळताच अग्निशामक दलाच्या १० गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आल्या आहेत़. आग मोठ्या प्रमाणावर आग पसरण्याचा धोका असून संपूर्ण परिसरात धूराचे मोठ मोठे लोट उठताना दिसत आहेत़. नदी काठाला लागून असलेल्या या गल्लीपर्यंत पोहचण्यात अग्निशामक दलाला मोठे शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत़. स्थानिक तरुणांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी व ही आग शेजारी झोपड्यांमध्ये पसरु नये, यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरु आहेत़.
या आगीच्या ठिकाणी जाण्यासाठी अग्निशामन दलाच्या वाहनांना जागा मिळावी, यासाठी परिसरातील वाहतूक रोखण्यात आली आहे़.वाहतूक शाखेचे १५ कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी गर्दी रोखण्याचे काम करीत आहेत़.
सोमवारी मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास पाटील इस्टेट झोपडपट्टीमधील गल्ली नंबर ५ मधील एका झोपडपट्टीला आग लागली होती़. चिंचोर्ळया गल्ल्यांमुळे अग्निशामक दलाची गाडी आत जाऊ शकत नव्हती़. आजही हीच परिस्थिती उद्भवली असून बघ्याच्या गर्दीमुळे अग्निशामक दलाच्या गाड्यांना पुढे जाण्यासाठी जागा मिळणे अवघड होत होते़.