शुक्रवार पेठेतील वाडिया हॉस्पिटलच्या नवीन इमारतीला आग; लाकडी फर्निचर जळून खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 03:14 PM2017-11-20T15:14:31+5:302017-11-20T15:21:07+5:30
शुक्रवार पेठेतील वाडिया हॉस्पिटल येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारतीच्या टेरेसवर सोमवारी दुपारी आग लागून त्यात तेथील गोडाऊनमधील लाकडी फर्निचर जळून खाक झाले़
पुणे : शुक्रवार पेठेतील वाडिया हॉस्पिटल येथे बांधण्यात येत असलेल्या नवीन इमारतीच्या टेरेसवर सोमवारी दुपारी आग लागून त्यात तेथील गोडाऊनमधील लाकडी फर्निचर जळून खाक झाले़ या इमारतीचे काम अजून सुरु असल्याने त्यात कोणीही नव्हते़
शुक्रवार पेठेतील वाडिया हॉस्पिटलच्या आवारात दुमजली इमारत बांधण्यात आली आहे़ या इमारतीचे काम सुरु होते़ त्यासाठी लागणारे प्लायवुड, खुर्च्या, वॉलपेपर अशा विविध वस्तू टेरेसवर पत्र्याचे गोडाऊन बनवून त्यात ठेवल्या होत्या़ सोमवारी दुपारी या गोडावूनला आग लागली़ अग्निशामक दलाला याची खबर दुपारी १ वाजून २८ मिनिटांनी मिळाली़ तातडीने २ बंब व ३ टँकर घटनास्थळी रवाना झाले़
गोडावूनमध्ये लाकडी साहित्य असल्याने त्यांनी पटकन पेट घेतला आणि काही मिनिटातच संपूर्ण गोडावून पेटले़ या आगीच्या ज्वाळा इतके उंच जात होत्या की शेजारील झाडाच्या फांद्यांनीही पेट घेतला होता़
अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख समीर शेख यांनी सांगितले, की ही इमारत मोकळी होती़ टेरेसवर आग लागली असल्याने आम्ही बाहेरुन जाऊन पाण्याचा मारा केला़ १ वाजून ५६ मिनिटांनी आग पूर्णपणे विझविण्यात आली़ या आगीत गोडावूनमध्ये ठेवलेला सर्व माल जळून खाक झाला़ त्या इमारतीत कोणीही नसल्याने आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अद्याप समजू शकली नाही़