जामिनावर सुटलेल्या चार आरोपींच्या स्वागतासाठी फोडले फटाके; पुन्हा झाली तुरुंगात रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 05:38 PM2021-03-24T17:38:14+5:302021-03-24T17:38:25+5:30
जामीनावर सुटल्यावर राडा केल्याने पुन्हा अटक
पुणे : खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपातून तुरुंगात असलेल्या चौघा गुन्हेगारांची जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांचे शिवणेमध्ये फटाके वाजवून स्वागत करण्याबरोबर लोकांना दमदाटी केली. त्यामुळे उत्तमनगर पोलिसांनी त्यांना पुन्हा अटक केली.
सागर भालेराव वारकरी (वय २२), अविनाश रामप्रताप गुप्ता (वय २०, रा. वेदगौरव सोसायटी, शिवणे), आकाश सिब्बन गौंड (वय १९), सागर राजेंद्र गौड (वय १९, रा. कदम वस्ती, शिवणे) व त्यांचे समर्थक सुरज राजेंद्र गौड (वय २४, रा. एन डी ए रोड, शिवणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अभिषेक गुप्ता व त्याचे इतर ६ ते ७ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक संतोष नांगरे यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना शिवणेमधील राहुलनगर येथील बसस्टॉपसमोर मंगळवारी दुपारी दीड वाजता घडली. उत्तमनगर पोलीस ठाण्यात गेल्या वर्षी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होता. त्यात सागर वारकरी, अविनाश गुप्ता, आकाश गौड आणि सागर गौड यांना अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात रवानगी झाली होती. न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केल्यानंतर मंगळवारी ते तुरुंगातून बाहेर आले होते. त्यानंतर वारकरी व इतरांच्या स्वागतासाठी त्यांचे साथीदार दुपारी दीड वाजता राहुलनगर येथील बसस्टॉपवर जमले होते. त्यांनी हे चौघेही तेथे आल्यावर जोरजोराने घोषणा देत फटाक्यांची आताषबाजी केली. नागरिकांना शिवीगाळ करुन दमदाटी करत दहशत निर्माण केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाच जणांना पकडले. अभिषेक गुप्ता व इतर ६ ते ७ जण पळून गेले. उत्तमनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.