फौजदाराच्याच अंगावर घातले वाहन
By admin | Published: May 19, 2017 04:32 AM2017-05-19T04:32:07+5:302017-05-19T04:32:07+5:30
चोरट्या वाळूची बेकायदा वाहतूक करणारांना अटकाव केल्यामुळे फौजदाराच्या अंगावर वाळू वाहतूक करणारे वाहन घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी रात्री
- लोकमत न्यूज नेटवर्क
इंदापूर : चोरट्या वाळूची बेकायदा वाहतूक करणारांना अटकाव केल्यामुळे फौजदाराच्या अंगावर वाळू वाहतूक करणारे वाहन घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडला. शहरातील कदम हॉस्पिटल चौकात ही घटना घडला. हा प्रकार करून वाहन घेऊन चालक पसार झाला.
हे वाहन जाऊ द्यावे, याकरिता फौजदाराच्या दुचाकीची चावी काढून घेऊन त्याच्याबरोबर झटापट केल्याच्या आरोपावरून दुचाकीवरून आलेल्या दोघा भावांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश बाबा जाधव, ज्ञानेश्वर बाबा जाधव (दोघे रा. माळवाडी नंबर १, ता. इंदापूर ) अशी त्यांची नावे आहेत. फौजदार अमोल रवींद्र ननवरे यांनी त्यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे.
ठाणे अंमलदार शिरीष लोंढे यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यातील काम आटोपून रात्री साडेदहाच्या सुमारास फिर्यादी ननवरे हे दत्तनगर येथील त्यांच्या घराकडे निघाले होते. पोलीस वसाहतीच्या पाठीमागे असणाऱ्या कदम हॉस्पिटल चौकातून जात असताना, समोरच्या कालठण नं. २ च्या रस्त्यावरुन वाळूने भरलेला विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर जोरात आपल्या रोखाने येत असल्याचे ननवरे यांनी पाहिले. त्यास चौकात अडवून ते चौकशी करत असताना, पडस्थळ रस्त्याने इंदापूरकडे येणाऱ्या रुग्णवाहिकेसाठी वाट देण्यासाठी काही मिनिटांसाठी ननवरे बाजुला झाले.हीच संधी साधून ट्रॅक्टर वरील चालकाने थेट ननवरे त्याला थांब म्हणत असताना त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. या अकस्मात हल्ल्यातून ननवरे यांनी कशीतरी सुटका करुन घेतली. तो ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेवून पसार झाला.
याच वेळी त्या ट्रॅक्टरच्या मागून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी ननवरेंच्या दुचाकीची चावी हिसकावून घेतली. वाळू भरलेला ट्रॅक्टर आमचा आहे. तो ट्रॅक्टर अडवायचा नाही. तो लांब जाईपर्यंत येथून जायचे नाही, असे म्हणत या दोघांनी ननवरे यांच्याशी झटापट केली. संधी साधून ननवरे यांनी आपले सहकारी पोलीस कर्मचारी डी. आर. अर्जुन व आर. डी. बडे यांना बोलावून घेतले. ते येत असल्याचे पाहून आरोपींपैकी ज्ञानेश्वर जाधव हा तेथून पळून गेला. गणेश जाधव यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. ट्रॅक्टर चालकाचे नाव समजले नाही. पोलीस निरीक्षक सजन हंकारे पुढील तपास करीत आहेत.