अग्निशमन दलाचे जवान ठरले देवदूत, लोखंडी जाळीत अडकलेल्या एक वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 05:27 PM2023-11-18T17:27:57+5:302023-11-18T17:28:27+5:30
मुलाला वेदना होत असल्याने ते रडत होते. जवानांनी जाळीजवळ मुलाच्या आईला बसविले.
पुणे : फ्लॅटच्या गॅलरी लावलेल्या लोखंडी जाळीत एक वर्षांच्या मुलगा अडकल्याची घटना सिंहगड रस्ता भागात घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी जाळीत अडकलेल्या मुलाची सुखरुप सुटका केली.
हिंगणे खुर्द परिसरात एका फ्लॅटच्या गॅलरीतील जाळीत एक वर्षांचा मुलगा अडकल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी मिळाली. सिंहगड रस्ता अग्निशमन केंद्रातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी तातडीने जाळीत अडकलेल्या मुलाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले. जवानांनी अग्निशमन उपकरणांचा वापर केला. मुलाचे डोके गॅलरीला लावलेल्या जाळीत अडकले होते.
अग्निशमन दलाचे जवान ठरले देवदूत, लोखंडी जाळीत अडकलेल्या एक वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका pic.twitter.com/O2B2SfzqNO
— Lokmat (@lokmat) November 18, 2023
मुलाला वेदना होत असल्याने ते रडत होते. जवानांनी जाळीजवळ मुलाच्या आईला बसविले. मुलाने डोके हलवून नये, म्हणून आई मुलाला समजावून सांगत असताना जवानांनी कुशलतेने कॉम्बी टुल किटमधील हायड्राॅलिक स्प्रेडर आणि जॅक या उपकरणांचा वापर करुन जाळीत अडकलेल्या मुलाची सुटका केली. मुलाच्या आई-वडिलांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे आभार मानले. जवान अशोक कडू, तुषार करे, संभाजी आटोळे, आदिनाथ पवार आदी मदतकार्यात सहभागी झाले होते.