अग्निशामक दलाचा गुरुवार ठरला ‘युद्धाचा’
By admin | Published: February 26, 2016 04:25 AM2016-02-26T04:25:48+5:302016-02-26T04:25:48+5:30
शहरामध्ये गुरुवारी दिवसभरात अग्निशामक दलाला विविध प्रकारच्या १४ वर्दी मिळाल्या. कुठे आग-तर कुठे कचरा पेटल्याचे, कुठे पक्षी-तर कुठे प्राणी अडकल्याचे ‘कॉल’ मिळताच
पुणे : शहरामध्ये गुरुवारी दिवसभरात अग्निशामक दलाला विविध प्रकारच्या १४ वर्दी मिळाल्या. कुठे आग-तर कुठे कचरा पेटल्याचे, कुठे पक्षी-तर कुठे प्राणी अडकल्याचे ‘कॉल’ मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी दाखल होऊन बचाव कार्य केले.
पहाटे कोरेगाव पार्क येथील जर्मन बेकरीजवळ तसेच दत्तवाडी येथील एका पत्राशेडला लागलेल्या आगीत वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जर्मन बेकरीजवळ असलेल्या एका तीन मजली इमारतीच्या तळमजल्यावरच्या दुकानांमधून पहाटे धूर येऊ लागला. याची माहिती मिळताच येरवडा आणि नायडू अग्निशमन केंद्रातील बंब घटनास्थळी रवाना झाले. जवानांनी तेथील लोकांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर येरवड्यातील गोल्फ क्लब चौकामध्ये एका चारचाकी वाहनाने पेट घेतल्याची वर्दी मिळाली. जवानांनी वाहनाला लागलेली आग विझवली. स्टेशन अधिकारी रमेश गांगड व विजय भिलारे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
दलाचे अधिकारी राजेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी कामगिरी बजावली. पुणे स्टेशन परिसरातील कैलास स्मशानभूमीजवळच्या लाकडांच्या साठ्याला आग लागली होती. तर, उंड्री येथील पाण्याच्या टाकीजवळील प्लॅस्टिक गोडाउनला सकाळी आग लागली होती. तर, धनकवडी येथील राजर्षी बँकेजवळच्या ट्रान्सफॉर्मरला आणि लष्कर भागातील एम. जी. रस्त्यावरच्या एका इमारतीतील मीटर बॉक्सला आग लागली होती. गेल्या काही दिवसांत आग लागण्याचे प्रमाण वाढले आहे. तीन दिवसांमध्ये रात्रीच्या वेळी आग लागण्याचे प्रमाण अधिक आहे.
दत्तवाडीमधील लायन्स क्लबजवळ एका मोठ्या पत्राशेडला गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास आग लागली. याची माहिती मिळताच एरंडवणा अग्निशमन केंद्रातील बंब आणि जवान घटनास्थळी दाखल झाले. सजावटीकरिता लागणाऱ्या साहित्याच्या साठ्याला आग लागल्यामुळे धुराचे लोट उठत होते. जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.