वाळूसम्राटांवर कारवाईचा फार्स!

By admin | Published: January 22, 2016 01:38 AM2016-01-22T01:38:45+5:302016-01-22T01:38:45+5:30

उजनी जलाशयाच्या परिसरात बेसुमार वाळूउपशाला इंदापूरच्या महसूल प्रशासनाकडूनच अभय मिळत आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

The fires of action on deserters! | वाळूसम्राटांवर कारवाईचा फार्स!

वाळूसम्राटांवर कारवाईचा फार्स!

Next

बारामती/पळसदेव : उजनी जलाशयाच्या परिसरात बेसुमार वाळूउपशाला इंदापूरच्या महसूल प्रशासनाकडूनच अभय मिळत आहे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गुरुवारी सकाळपासून वाळूउपसा करणाऱ्या सम्राटांवर कारवाई होणार, अशी चर्चा सुरू झाली. तलाठी, मंडल अधिकारी कुंभारगावच्या उजनी परिसरात आले. समोर सुरू असलेला वाळूउपसा चालूच होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत कारवाईसाठी तहसीलदार येणार, असे सांगितले; मात्र ते आलेच नाहीत. तोपर्यंत वाळूसम्राटांनी जवळपास २५ ते २६ बोटी गायब केल्या.
उजनीच्या परिसरात जोरदार वाळूउपसा होत असल्यामुळे वाळूसम्राटांनी स्थानिकांना ‘पॅकेज’ दिले आहे, अशी चर्चा सतत केली जाते. कारवाई होणार असल्याची माहिती महसूल कर्मचाऱ्यांकडूनच वाळूसम्राटांना दिली जाते. या पार्श्वभूमीवर आजच्या वाळूसम्राटांवरील कारवाईचा ‘लोकमत’ने सकाळपासून पाठपुरावा केला. सकाळी ८ वाजल्यापासून वाळूउपसा करणाऱ्या बोटींवर कारवाई होणार, अशी चर्चा होती. कारवाईसाठी तलाठी, मंडल अधिकारी, अन्य कर्मचारी उजनीकाठी एकत्रित आले. वाळूसम्राट सावध झाले. काहींनी गुप्तपणे या कर्मचाऱ्यांशी चर्चा सुरू केली. पुढे काय कारवाई तर होईनाच. कारवाईसाठी आलेले महसूल कर्मचारी उजनीकाठी गप्पा मारण्यात दंग झाले.
तहसीलदार आल्यावर जोरदार कारवाई होणार आहे, असे सांगितले गेले. मात्र, कारवाईबाबत सर्वच संभ्रमावस्था होती. तहसीलदारांना संपर्क साधला तर ते फोन उचलत नव्हते. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हा प्रकार सुरू होता. त्यानंतर प्रांताधिकारी कारवाई करणार आहेत, असे सांगण्यात आले. त्यांचाच वाळूसम्राटांवर वचक आहे, असेदेखील बोलले जात होते.
मात्र, सायंकाळपर्यंत कारवाई तर झालीच नाही.
तलाठी, मंडल अधिकाऱ्यांनी उजनीकाठी बसून काय केले, तर वाळूसम्राट त्यांच्या बोटी कारवाईच्या भीतीने गायब करीत असल्याचे पाहत बसले. त्यामुळे प्रांताधिकारी संतोष जाधव यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना तलाठी, मंडल अधिकाऱ्यांचे काय व कसे सहकार्य मिळत असेल, हे विचारूच नका, असे परिसरातील नागरिक सांगू लागले. अखेरपर्यंत तहसीलदार कारवाईच्या ठिकाणी आलेच नाहीत. त्यामुळे वाळूसम्राट व महसूल कर्मचाऱ्यांचे लागेबांधे आहेत काय, अशी चर्चा सुरू झाली. (प्रतिनिधी)

Web Title: The fires of action on deserters!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.