मार्केट यार्डमधील फळबाजारात फटाक्यांची आतषबाजी ; बाजारातील कचऱ्याने घेतला पेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2018 08:50 PM2018-10-14T20:50:48+5:302018-10-14T20:52:37+5:30
गुलटेकडी येथील मार्केट यार्ड मधील फळ बाजारात रस्त्यावर बाजारातील पेढा, कागद, लाकडी फळ्याचा कचरा पडला असताना या कच-यामध्येच एका डमी आडत्यांच्या वाढदिवसानिमित्त फटाक्यांची मोठी माळ लावून आतषबाजी करण्यात आली. यामुळे मात्र काही कळायच्या आत या कच-याने पेट घेतला व सर्वांच गोंधळ उडाला.
पुणे : गुलटेकडी येथील मार्केट यार्ड मधील फळ बाजारात रस्त्यावर बाजारातील पेढा, कागद, लाकडी फळ्याचा कचरा पडला असताना या कच-यामध्येच एका डमी आडत्यांच्या वाढदिवसानिमित्त फटाक्यांची मोठी माळ लावून आतषबाजी करण्यात आली. यामुळे मात्र काही कळायच्या आत या कच-याने पेट घेतला व सर्वांच गोंधळ उडाला.
रविवार असल्याने बाजारात पुणेकरांची प्रचंड गर्दी होती. यामुळे येथे काही लोकांनी प्रसंगावधान राखत तातडीन पाणी टाकून अंग विझविण्याचा प्रयत्न केला. यामुळे मोठा अनर्थ टळला. बाजार समितीचे मुख्य प्रशासक बी.जे. देशमुख यांच्या समोरच हा सर्व धक्कादायक प्रकार घडला. बाजार समितीच्या आवारात फटाके वाजविण्यास बंदी असताना कुणाच्या ना कुणाच्या वाढदिवस, निवड-नियुक्ती निमित्त असे प्रकार होत असल्याचे आवारातील लोकांनी सांगितले.
गुलटेकडी येथील श्री शिव छत्रपती मार्केट यार्डमध्ये दररोज प्रचंड गर्दी असते. परंतु प्रत्येक रविवारी इतर दिवसांपेक्षा अधिक गर्दी असते. शहर, जिल्ह्यातील किरकोळ विक्रेत्यासोबतच शहरातील सर्वसामान्य नागरिक देखील मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळे घेण्यासाठी मार्केटमध्ये येतात. मार्केट यार्डातील सर्वच फळ बजार, फुल बाजार आणि तरकारी विभागात रस्त्यावर पेढा, कागद, लाकडी फळ्या असा सुखा कचरा मोठ्या प्रमाणात पडलेला असतो. त्यामुळे बाजार आवारात कोणत्याही प्रकारचे फटाके वाजविण्यास बंदी आहे. परंतु असे असताना रविवार (दि.१४) रोजी दुपारी १२ वाजता फळ बाजारात एका डमी अडत्याच्या वाढदिवसानिमित्त बाजारात कच-यामध्ये फटाक्यांची मोठी माळ लावून जोरदार आतषबाजी करण्यात आली. या फटाक्यामुळे रस्त्यावर पडलेल्या कच-याने त्वरीत पेट घेतला. यामुळे उपस्थित विक्रेते व नागरिकांमध्ये चांगला गोंधळ उडाला. परस्थितीचे गांर्भिय ओळखून उपस्थितांनी त्वरीत आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. रविवारी वारा कमी असल्याने आगीने मोठे रुप धारण केले नाही व वेळीच आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात गेल्या काही वर्षांपासून आडत्यांच्या वाढदिवसाला केक कापून फटाक्यांची आतषबाजी करण्याचा ट्रेंड वाढला आहे. यासाठी प्रशासनाने परिपत्रक काढून फटाके वाजविण्यास बंदी घातली आहे. परंतु प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत व्यापरी, आडत्याकडून नियमित पणे फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. बाजारात दररोजी ३० ते ४० हजार लोकांची वर्दळ असते, अशा घटनांमुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच या प्रकारांना आळा बसण्याऐवजी प्रोत्साहन मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.
मार्केट यार्डची सुरक्षा रामभरोसे
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये मुंबईनंतर राज्यातील सर्वांत मोठा बाजार भरतो. राज्यासह परराज्यातील माल देखील येथे मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे दररोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या व व्यापरी, नागरिकांची प्रचंज गर्दी असलेला हा बाजार आहे. परंतु सुरक्षितेच्या दृष्टीने येथे कोणत्याही स्वरुपांच्या उपाय-योजना नाही. गेल्या काही वर्षांत विविध कारणांमुळे मार्केट यार्डमध्ये अग लागण्याच्या अनेक लहान-मोठ्या घटना झाल्या आहेत. परंतु त्यानंतर देखील येथे कोणत्याही स्वरुपाची अग्नीशमन यंत्रणा बसविण्यात आलेली नसल्याचे व्यापा-यांनी सांगितले.
नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कठोर कारवाई
बाजार समितीच्या आवारात फटाके वाजविण्यास प्रशासनाने पूर्णपणे बंदी घातली आहे. परंतु त्यानंतर देखील नियमितपणे येथे फटाक्यांची आतषाबाजी करण्यात येते. नियमांचे उल्लंघन करणा-यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. रविवारी फटाके वाजविणा-या संबंधित आडत्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत त्याचा परवाना निलंबीत करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याखेरीज कर्तव्यास कसूर करणा-या गटप्रमुखांवरही कारवाई करण्यात येईल.
- बी. जे. देशमुख, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती