किरकोळ कारणावरुन गोळीबार करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 09:29 PM2018-08-07T21:29:35+5:302018-08-07T21:36:28+5:30
मित्र, मैत्रिणीबरोबर हॉटेलमध्ये फ्रेंडशिप डे साजरा करत असताना शेजारच्या टेबलावरुन कॉमेंटवरुन झालेल्या वादावादीत एका तरुणाने आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून हवेत चार गोळ्या झाडल्या़.
पुणे : हॉटेलमध्ये मित्र, मैत्रिणीबरोबर फ्रेंडशिप डे साजरा करत असताना शेजारच्या टेबलावरुन कॉमेंटवरुन झालेल्या वादावादीत एका तरुणाने आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून हवेत चार गोळ्या झाडल्या़. सुदैवाने त्या कोणाला लागल्या नाहीत़. मात्र, त्यामुळे हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला होता़.
पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखेने या घटनेचा शोध घेऊन या तरुणाला अटक केली आहे़. तेजस प्रकाश गोंधळे (वय २५, रा़ तेजदीप निवास, संकल्प सोसायटी, गोंधळेनगर, हडपसर) असे त्याचे नाव आहे़. ही घटना मुंढवा येथील हॉटेल नाईट रायडर येथे सोमवारी ६ आॅगस्टला मध्यरात्री एक ते सव्वाएकच्या दरम्यान घडली होती़. गोंधळे यांच्याकडून रिव्हॉल्व्हर, २ जिवंत काडतुसे व ४ रिकाम्या पुंगळ्या जप्त करण्यात आल्या आहेत़.
याप्रकरणी सहायक पोलीस फौजदार सुरेश सखाराम सोनवणे यांनी मुंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, तेजस गोंधळे यांचा पाण्याचा टँकर व दोन रेशनची दुकाने आहेत़ त्यांच्या नातेवाईकांची हत्या झाल्याने त्यांनी स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्व्हरचा परवाना घेतला आहे़. रविवारी रात्री ते फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी आपल्या २ मैत्रिणी व ४ मित्रांसह हॉटेल नाईट रायडर येथे गेले होते़. जेवण झाल्यानंतर मध्यरात्री एकच्या सुमारास ते जाण्यासाठी निघाले़ तेव्हा त्यांच्या शेजारच्या टेबलवरील तरुणांनी काही कॉमेट पास केल्या़ .त्यावरुन गोंधळे यांचे मित्र चिडले, त्यांच्यात वादावादी झाली़ गोंधळे मित्राला सोडवायला गेले़. त्यांच्याशी वाद सुरु झाला़. तेव्हा त्यांनी आपल्याकडील रिव्हॉल्व्हर काढून हवेत चार गोळ्या झाडल्या़. या गोळीबाराने हॉटेलमध्ये एकच गोंधळ उडाला़. अनेक ग्राहक घाबरुन हॉटेल बाहेर पळून गेले़. या प्रकारानंतर सर्व जण निघून गेले़. त्यामुळे या घटनेची कोणतीही माहिती पोलिसांना दिली गेली नाही़ .
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांना याची माहिती मिळाली़. त्यांनी गुन्हे शाखेच्या युनिट ५ चे पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांना चौकशी करण्यास सांगितले़. मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पाथ्रुडकर यांनी घटनास्थळाला भेट घेऊन माहिती घेतली़. हॉटेलमधील सीसीटीव्हीचे फुटेज तपासल्यानंतर हा प्रकार झाल्याचे निष्पन्न झाले़. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तेजस गोंधळे यांना अटक केली़.
हॉटेलवरही कारवाई करणार
याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले, की हॉटेलमध्ये झालेल्या या प्रकाराची माहिती हॉटेलचालकाने पोलिसांना देणे बंधनकारक होते़. कोणताही गुन्हा घडत असेल तर त्याची माहिती पोलिसांना कळविणे नागरिकांचे कर्तव्य आहे़.त्यामुळे या हॉटेलवरही कारवाई करण्यात येणार आहे़.
तेजस गोंधळे यांना स्वरंक्षणासाठी रिव्हॉल्व्हरचा परवाना दिला असतानाही त्यांनी त्यातील शर्तीचा भंग करुन हॉटेलमधील लोकांची सुरक्षितता धोक्यात येईल, असे कृत्य केल्याने त्यांचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव मुंढवा पोलिसांनी पाठविला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथ्रुडकर यांनी दिली.