पुण्यात किरकोळ कारणावरून गोळीबार अन् दगडफेक; जखमी महिलेचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 10:04 IST2025-01-02T10:04:02+5:302025-01-02T10:04:36+5:30
शितल चव्हाण यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? गोळी लागल्याने झाला की दगडफेकीत झाला याचे उत्तर मात्र अद्यापही अनुत्तरीत आहे.

पुण्यात किरकोळ कारणावरून गोळीबार अन् दगडफेक; जखमी महिलेचा दुर्दैवी मृत्यू
- किरण शिंदे
पुणे - घरासमोर लघुशंका करणाऱ्यांना हटकल्याने त्यांनी केलेल्या गोळीबारात आणि दगडफेकीत जखमी झालेल्या एका महिलेचा मृत्यू झालाय. लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील थेऊर परिसरात ही घटना घडली. शितल अक्षय चव्हाण (वय २९) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर ६ ते ७ आरोपींपैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. भानुदास शेलार, अजय मुंढे आणि नाना मुंढे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात जय मल्हार हॉटेल आहे. या हॉटेललगत असणाऱ्या मोकळ्या जागेत अक्षय चव्हाण, पत्नी शितल चव्हाण आणि कुटुंबीय राहत होते. अक्षय त्याच ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. दरम्यान शुक्रवारी सकाळी सहा ते सात तरुण त्या ठिकाणी कारमधून आले. तेथील मोकळ्या जागेत ते लघुशंका करत होते. सुरक्षारक्षक असणाऱ्या अक्षय चव्हाण यांनी त्याला हटकले. यावरून दोघात हाणामारी सुरू झाली. आरोपींनी चव्हाण कुटुंबीयावर दगडफेक केली. इतकच नाही तर आरोपींनी चव्हाण कुटुंबीयांच्या दिशेने गोळीबार देखील केला.
या गोळीबारात आणि दगडफेकीत शितल चव्हाण या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे शितल चव्हाण यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? गोळी लागल्याने झाला की दगडफेकीत झाला याचे उत्तर मात्र अद्यापही अनुत्तरीत आहे. बुधवारी शितल यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला. नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न केला.