पुण्यात परदेशी व्यक्तीच्या घरावर फायरींग! परिसरात खळबळ, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 09:32 PM2023-11-07T21:32:11+5:302023-11-07T21:34:57+5:30
गेल्या दीड वर्षांपासून फिर्यादी हे पत्नी व तीन वर्षांच्या मुलींसोबत बाणेर भागातील नागरास रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीत राहतात...
पुणे : बाणेर भागात वास्तव्यास असलेल्या एका परदेशी नागरिकाच्या सदनिकेवर मंगळवारी (दि. ७) गोळी झाडण्याचा प्रकार घडला. सदनिकेत बंदुकीची पुंगळी आढळून आल्याने सोसायटीत खळबळ उडाली. याप्रकरणी ३६ वर्षीय दक्षिण कोरियन नागरिकाने चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी हे बाणेर भागातील एका उच्चभ्रू सोसायटीत दहाव्या मजल्यावर राहतात. फिर्यादी यांचे कोणाशी भांडणही झालेले नाही. त्यामुळे आरोपीना फिर्यादी यांच्या सदनिकेवरच गोळीबार करायचा होता की दुसरे कोणावर? याचा शोध पोलिस घेत आहेत.
याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी सकाळी सहा वाजून १० मिनिटांनी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे चाकण येथील एका आंतरराष्ट्रीय कंपनीत रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागात कामाला आहेत. गेल्या दीड वर्षांपासून फिर्यादी हे पत्नी व तीन वर्षांच्या मुलींसोबत बाणेर भागातील नागरास रोडवरील एका उच्चभ्रू सोसायटीत राहतात.
फिर्यादी हे मंगळवारी (दि. ७) झोपेतून उठून मोबाइल मेसेज पाहत होते. तेव्हा गॅलरीची काच फुटल्याचा आवाज आला. यावेळी फिर्यादी यांनी कशाचा आवाज आला म्हणून पाहायला गेले तेव्हा बेडरूमच्या काचेच्या स्लायडिंग दरवाजाला छिद्र पडल्याचे दिसले. तसेच गॅलरीची काच फुटलेली दिसली आणि एक पुंगळी बेडला लावलेल्या मच्छरदाणीत अडकली होती. फिर्यादी यांनी ही गोष्ट त्यांच्या चालकाला सांगितली. यानंतर चालकाने ही बाब पोलिसांना सांगितली. लगेच चतु:शृंगी पोलिसांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) अंकुश चिंतामण करीत आहेत.
दरम्यान, दक्षिण कोरियन नागरिकाच्या सदनिकेवर कुठल्या प्रकारच्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आला आहे, स्पष्ट झाले नाही. फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर किंवा आरोपी पकडले गेल्यानंतर ही गोळी कुठल्या बंदुकीची होती हे कळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.