बारामतीत गोळीबार
By admin | Published: January 26, 2016 01:45 AM2016-01-26T01:45:20+5:302016-01-26T01:45:20+5:30
पूर्ववैमनस्यातून रविवारी मध्यरात्री रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्याचबरोबर तरुणाला गोळ्या घालून जिवे मारण्याचा प्रकार
बारामती : पूर्ववैमनस्यातून रविवारी मध्यरात्री रस्त्यात अडवून मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्याचबरोबर तरुणाला गोळ्या घालून जिवे मारण्याचा प्रकार आरोपींच्या तावडीतून शिताफीने पळून गेल्यामुळे फसला. कसबा, पंचशीलनगर मरिआई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला. आरोपींनी अत्याधुनिक पिस्तूलमधून गोळीबार केल्याची फिर्याद देण्यात आली आहे.
आरोपी रोहित केशव जगताप (रा. कसबा, जामदार रोड), लोकेश परशुराम माने (रा. कै काड गल्ली) आणि त्यांच्या एका अनोळखी साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मयूर रवींद्र जाधव (वय २४, रा. सिद्धेश्वर गल्ली) याने फिर्याद दिली.
जाधव याचे सलूनचे दुकान सातव संकुल, कसबा येथे आहे. सहा महिन्यांपूर्वी आरोपी आणि फिर्यादी यांच्या गटात मारामारी झाली होती. त्या वेळी फिर्यादी व त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा राग मनात धरून जाधव याला घरी जात असताना रस्त्यात रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास गाठून मारहाणीस सुरुवात केली. त्याचदरम्यान आरोपी लोकेश याने अत्याधुनिक पिस्तूल रोखून जिवे मारण्याची धमकी दिली. त्याचदरम्यान, त्यांच्या तावडीतून जाधव सुटला. त्याने मरिआई मंदिराच्या बाजूने स्वत:चा बचाव करत पलायन केले.
लोकेश याने आपल्या बाजूने एक गोळी मारली. मात्र, आपण लपून बसल्याने त्यांचा प्रयत्न फसला, असे पोलिसांना त्याने सांगितले. बारामती शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने गोळीबार केलेल्या ठिकाणी आज दिवसभर पाहणी केली. मात्र, त्यांना काडतूस आढळून आले नाही. तिघेही आरोपी फरार झाले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम. ए. खान करीत आहेत.