Video : सोन्याच्या दुकानात गोळीबार :कारण अज्ञात, पोलिसांचा तपास सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 04:30 PM2018-11-21T16:30:58+5:302018-11-21T17:19:22+5:30
कोंढवा येथील येवलेवाडीमध्ये भर बाजारपेठेत असलेल्या गणेश ज्वेलर्स या दुकानात कामगार चार जणांनी गोळीबार केला आहे.
पुणे : कोंढवा येथील येवलेवाडीमध्ये भर बाजारपेठेत असलेल्या गणेश ज्वेलर्स या दुकानात कामगार चार जणांनी गोळीबार केला आहे. यात दुकानातील कामगार अमृत मेघावल या गंभीर जखमी झाला आहे. त्याला हाताला गोळी लागली असून उपचारासाठी भारती विद्यापीठ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
येवलेवाडीत मुख्य कमानीतून आत आल्यावर डाव्या हाताला असलेल्या या सोने-चांदीच्या दुकानात नेहमीप्रमाणे बसले होते. दुपारी चार व्यक्ती दुकानात आल्यावर त्यांनी अमृत बरोबर चर्चा केल्याचे दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्या मधून दिसून येत आहे. त्यांनतर त्यातील एकाने अमृतवर गोळी झाडली.
यानंतर हल्लेखोर दोन दुचाकीवरून कात्रजच्या दिशेने फरार झाले. या दुकानाचे मालक मालतसिंग ओदसिंग देवठी हे त्यांच्या गावी मागील आठ दिवसांपासून गेलेले आहेत. तेव्हापासून अमृत हा एकटाच दुकान सांभाळत आहे. विशेष म्हणजे दुकानातील कोणत्याही सोन्या-चांदीच्या वस्तूना हल्लेखोरांनी चोरल्या नाहीत किंवा तसा प्रयत्न केल्याचेही दिसून येत नाही. यांमुळे हा दरोड्यांचा प्रयत्न होता की यामागे वेगळे कारण आहे, याचा अधिक तपास कोंढवा पोलिस करीत आहेत.कोंढवा पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील आणि इतर अधिकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहाय्यक आयुक्त समीर शेख, दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम आणि इतर अधिकारी येवलेवाडीच्या दिशेने रवाना झाले आहेत. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी परिसराची पाहणी करून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. हल्लेखोराने दरोडा टाकण्याच्या उद्देशाने गोळीबार केला अथवा इतर कोणत्या अन्य कारणावरून गोळीबार झाला हे अद्याप स्पष्ट होवु शकलेले नाही.
पाहा व्हिडीओ