हॉटेल व्यावसायिकावर गोळीबार
By admin | Published: April 20, 2015 04:29 AM2015-04-20T04:29:19+5:302015-04-20T04:29:19+5:30
जेवणाची आॅर्डर उशिरा आल्याने झालेल्या वादातून अमोल तुकाराम भालेकर (वय ३०, रा. रुपीनगर, तळवडे) या हॉटेल व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला
पिंपरी : जेवणाची आॅर्डर उशिरा आल्याने झालेल्या वादातून अमोल तुकाराम भालेकर (वय ३०, रा. रुपीनगर, तळवडे) या हॉटेल व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला. ही घटना देहू-तळवडे रस्त्यावरील शिवरत्न हॉटेल येथे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. गोळीबारानंतर झालेल्या झटापटीत अमोल यांचे बंधू विशाल यांच्याही डोक्याला किरकोळ जखम झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी दत्तात्रय वाळके (रा. म्हाळुंगे) याला अटक केली असून, तिघेजण अद्यापही फरार आहेत. पोलीस निरीक्षक अमर वाघमोडे यांनी दिलेली माहिती अशी : भालेकर यांचे देहू-तळवडे रस्त्यावर शिवरत्न नावाचे हॉटेल आहे. शनिवारी रात्री वाळके व त्याचे साथीदार येथे जेवणासाठी आले होते. दरम्यान, चौघांपैकी एकाने अमोल यांच्यावर गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या डाव्या पायाला लागली. तसेच या वेळी झटापटीत अमोल यांचे बंधू विशाल यांच्याही डोक्याला किरकोळ जखम झाली. जखमी अवस्थेतील अमोल यांना सुरुवातीला पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर चिंचवड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनास्थळावरून पोलिसांना एक पुंगळी सापडली आहे. मात्र, पिस्तूल अद्याप हाती लागलेले नाही. तसेच या हल्ल्यात वापरलेली दोन वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
फरार आरोपींच्या शोधासाठी विविध ठिकाणी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपींबाबत सर्व माहिती मिळाली असून, लवकरच त्यांना जेरबंद करण्यात येईल, असे वाघमोडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)