इंदापूरात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पराभवाचा राग मनात धरुन हवेत गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 11:20 AM2023-11-07T11:20:38+5:302023-11-07T11:21:02+5:30
निवडणुकीत पराभव झाल्याने गावात दहशत करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत हवेत गोळीबार करण्याची घटना घडली
काझड: इंदापुर येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा राग मनात धरुन हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश शिवदास काटकर यांच्या फिर्यादीवरून काझड मध्ये काझड-अकोले रोडवर सिद्धनाथ किराणा समोर येऊन शिवीगाळ करून अग्निशस्त्रातून हवेमध्ये गोळीबार करत गावात दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी काझड मधील राहुल चांगदेव नरूटे व समीर मल्हारी नरूटे याच्या विरोधात पोलिसांनी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याच्या व दहशत माजवल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सोमवार दि ६ रोजी ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये सदस्य पदाच्या निवडणुकीत पराभव झाल्याने गावात दहशत करण्याच्या उद्देशाने शिवीगाळ करत हवेत गोळीबार करण्याची घटना घडली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पाठला केला असता आरोपींकडील कार रस्त्याच्या मध्ये थांबून अडविण्याचा प्रयत्न केला. सदर आरोपींनी सदरची गाडी अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व अंधाराचा फायदा घेऊन सदरील आरोपी पळून गेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सदर घटनेची अधिक सखोल चौकशी करण्यात येत आहे.