पुण्यात व्यावसायिकावर झाडली गोळी, जुन्या वादातून संघटनेच्या सदस्यावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 12:40 AM2022-06-15T00:40:41+5:302022-06-15T00:41:38+5:30
शहरातील गजबजलेला कॅम्प येथील फॅशनस्ट्रिट परिसरात व्यापारी संघटनेतील दोघांमध्ये असलेल्या पूर्वीच्या वादातून एकाने गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.
पुणे- कॅम्प परिसरात एका व्यवसायिकावर आपसातील वादातून गोळी झाडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली. मोहम्मद रफी चौक, ए बी सी फार्म जवळ ही घटना घडली. फॅशन व्यवसायिक संघटनेचा सदस्य असलेला तोफिक अख्तर शेख (४५) यांच्यावर, त्याच्याच व्यापारी सहकाऱ्याने सायंकाळी ८ च्या सुमारास गोळी झाडली आणि तो फरार झाला. व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या जुन्या व्यवसायिक आणि प्रशासकीय वादामुळे हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे.
शहरातील गजबजलेला कॅम्प येथील फॅशनस्ट्रिट परिसरात व्यापारी संघटनेतील दोघांमध्ये असलेल्या पूर्वीच्या वादातून एकाने गोळीबार केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत लष्कर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तोफिक अख्तर शेख ( ४५) (रा. भीमपुरा, कॅम्प पुणे)
हा फॅशन मार्केट येथील व्यवसायिक आसून तो येथील व्यापारी संघटनेचा पदाधिकारी देखील आहे. सध्या फिर्यादी शेख यांचे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासाविरोधात पुणे न्यायालयात खटले सुरू आहेत. व्यापाऱ्यांमध्ये असलेल्या वादामुळे शेख यांचा दुसऱ्या सहकाऱ्यासोबतही वाद झाला. आज तोफिक शेख सायंकाळी 8 च्या सुमारास ए बी सी फार्म दुकानाजवळ आला असता आरोपी तेथे छऱ्याची बंदूक घेऊन पोहोचला. तोफिक याला पाहून त्याने तोफिक वर बंदूक रोखत गोळीबार केला. या गोळीबारांत तोफिक जखमी झाला. आरोपीने फिर्यादी शेख यांच्या पोटावर छऱ्याच्या बंदुकीतून एक गोळी झाडली असता ती फिर्यादी यांच्या बरगडी खाली घासून निघून गेली आसून सध्या फिर्यादीला ससून रुग्णालयात वॉर्ड क्र ७ मध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गर्दीने गजबजलेल्या ठिकाणी ऐन रात्रीच्या वेळी गोळीबार झाल्याने एम जी रोड वर मोठी खळबळ उडाली आहे.
लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी म्हटले आहे, की फिर्यादीकडून मिळालेल्या माहिती नुसार, जुन्या वादातून ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी पोहोचले. यासंदर्भात तपास सुरू करण्यात आला आहे.