सराफी दुकानात गोळीबार करून कामगाराची हत्या करणारे जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2018 01:36 AM2018-12-06T01:36:48+5:302018-12-06T01:36:54+5:30
कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथील सराफी दुकानात शिरून तेथील कामगाराची गोळी घालून हत्या करणाऱ्या बिहारी टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे़
पुणे : कोंढवा परिसरातील येवलेवाडी येथील सराफी दुकानात शिरून तेथील कामगाराची गोळी घालून हत्या करणाऱ्या बिहारी टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे़ बिहारमधील वैशाली जिल्ह्यातून चौघांना अटक करण्यात आली आहे़ मात्र, त्यांनी हा गोळीबार का केला याचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही़
कुंदन विजय सिंग (वय २३), अमित विजय सिंग (वय २०, रा. पुणे, मु. बिहार), रिशू संजय सिंग (वय २१), विकास सुरेश सिंग (१९, रा. बिहार) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. रवी सिंग (२५) हा फरार झाला आहे़ २१ नोव्हेंबर रोजी शहरात एकाच दिवशी ३ गोळीबाराच्या घटना घडल्या होत्या. भरदुपारी येवलेवाडी येथील गणेश ज्वेलर्समध्ये शिरलेल्या चौघांनी कामगार अमरत परिहार यांच्यासोबत वाद घालून त्याच्यावर गोळी झाडली होती. या घटनेचे दुकानातील सीसीटीव्हीवर फुटेज मिळाले होते. मात्र, त्यांनी दुकानातील काहीही माल चोरला नव्हता़ घटनेच्या सहा दिवसांपूर्वी हडपसर येथील डी मार्ट व कोंढवा येथील इस्कॉन मंदिराजवळ ३ दिवसांपूर्वी २ दुचाकी चोरल्याचेही समोर आले आहे. घटनेनंतर त्यांनी या दोन्ही दुचाकी डोंगराच्या कडेला सोडून ते पळून गेले होते़ घटनेनंतर आरोपी रात्री रेल्वे स्थानकातून पुणे-धानापूर एक्स्प्रेसने बिहारला पळून गेले होते. सोशल मीडियावर हे फुटेज व्हायरल झाल्यानंतर यातील आरोपींना कोेंढव्यात पाहिले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परिमंडळ पाचचे उपायुक्त प्रकाश गायकवाड, गुन्हे शाखेचे उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख व मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपक निकम, उपनिरीक्षक विवेक पाडवी व पथकाने त्यांना बिहारमधील वैशाली जिल्ह्यातून अटक केली.
>दिल्लीतही एक खुनाचा गुन्हा दाखल
आरोपी कुंदन व अमित हे सख्खे भाऊ आहेत. बीए आणि बीकॉमचे शिक्षण घेत आहेत. कुटुंबासोबत अनेक वर्षांपासून कोेंढव्यात राहत आहेत. वैयक्तिक वादातून खून झाला असावा अशी शक्यता आहे. फरार रवी सिंग याच्यावर दिल्लीतही एक खुनाचा गुन्हा दाखल असून, त्याचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती अनिल पाटील यांनी दिली.
आरोपींनी अद्याप नेमका कोणत्या कारणास्तव अमरतचा खून केला, हे उघड झाले नाही. त्याबाबत चौकशी सुरू आहे. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील बी. आर. पाटील यांनी कोठडीची मागणी केली. चौघांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.