देहूगावातील युवकावर गोळीबार
By Admin | Published: May 13, 2014 02:22 AM2014-05-13T02:22:28+5:302014-05-13T02:22:28+5:30
प्रेमसंबंधाला विरोध करतो, याचा राग मनात धरून दुचाकीस्वार दोघा हल्लेखोरांनी तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला. मात्र गोळी मोटारीच्या मागील दरवाजाला लागल्याने यात जखमी झालेले नाही
देहूगाव : प्रेमसंबंधाला विरोध करतो, याचा राग मनात धरून दुचाकीस्वार दोघा हल्लेखोरांनी तरुणावर पिस्तुलातून गोळीबार केला. मात्र गोळी मोटारीच्या मागील दरवाजाला लागल्याने यात जखमी झालेले नाही. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले. ही घटना रविवारी रात्री तळवडेजवळील कॅनबे चौकात घडली. याबाबत सचिन रामभाऊ काळोखे (वय २७, रा. देहूगाव) याने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी साईनाथ मोहिते (रा. तळवडे, ता. हवेली, पुणे) व त्याचा साथीदार (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. रविवारी रात्री सचिन व त्याचे कुटुंबीय चास (ता. खेड) येथे नातेवाइकांच्या लग्नाला गेले होते. या लग्नावरून मोशी- देहूगाव मार्गे रात्री सव्वानऊच्या सुमारास परतत असताना साईनाथ व त्याचा साथीदार दुचाकीवरून पाठलाग करीत आले. साईनाथ मागे बसला होता व त्याचा साथीदार हा गाडी चालवीत होता. सचिन याची मोटार तळवडे येथील कॅनबे चौकाजवळ आली असता साईनाथच्या साथीदाराने मोटारीच्या बरोबरीने दुचाकी चालविली. कोणीतरी आपला पाठलाग करीत असल्याचे सचिनच्या लक्षात येताच त्याने गाडी चालकाला मोटारीचा वेग वाढविण्यास सांगितले. त्याच वेळी साईनाथ याने सचिनच्या दिशेने एक गोळी झाडली. अचानक झालेल्या गोळीबाराने गाडीतील सर्वच जण घाबरून गेले. त्यांनी गाडी थांबविली. दरम्यान, मोटार वेगात असल्याने त्याचा नेम चुकला व ती गोळी मोटारीच्या डाव्या बाजुच्या दरवाज्याला लागली. त्यामुळे सचिन बचावला. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)