फिरोदिया करंडकाला जल्लोषात सुरुवात
By admin | Published: February 21, 2017 03:16 AM2017-02-21T03:16:26+5:302017-02-21T03:16:26+5:30
तिसरी घंटा होते, पडदा सरकतो आणि रंगमंच प्रकाशाने देदीप्यमान होतो. आता कोणता आविष्कार सादर होणार, याची उत्कंठा
पुणे : तिसरी घंटा होते, पडदा सरकतो आणि रंगमंच प्रकाशाने देदीप्यमान होतो. आता कोणता आविष्कार सादर होणार, याची उत्कंठा प्रत्येकाच्या मनात दाटते आणि क्षणार्धात मंचावर एकाचवेळी अभिनय, नृत्य, संगीत, चित्रकला, हस्तकला अशा विविध कलांचा मनोहारी खेळ सुरू होतो. या कलासंगमातून जणू एक चित्रपटरूपी दृश्याविष्कारच अनुभवत असल्याची प्रचिती येते, आणि हृदयातून ओठात येते ती एक उत्स्फूर्त ‘दाद’!
या अभूतपूर्व कलाविष्कारांचे प्रतिबिंब उमटणारे व्यासपीठ म्हणजे ‘फिरोदिया करंडक’. या स्पर्धेला विद्यार्थ्यांच्या जल्लोषात सोमवारी सुरूवात झाली. आपल्या महाविद्यालयांच्या सादरीकरणांना पाठिंबा देण्यासाठी विद्यार्थ्यांची लागलेली चढाओढ अन् कलाविष्कारांविषयीची शिगेला पोहोचलेली उत्सुकता अशा भारावलेल्या वातावरणात ही स्पर्धा रंगली.
अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेचे संकल्पक आणि प्रमुख संयोजक सूर्यकांत कुलकर्णी, जयश्री फिरोदिया, मीनल परांजपे यांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचा प्रारंभ गतवर्षीच्या विजेत्या महाविद्यालयाने करण्याची प्रथा आहे, त्यानुसार सकाळच्या सत्रात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) च्या दर्जेदार सादरीकरणाने झाला. त्यानंतर एमएमसीओई व राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या एकसे बढकर एक प्रयोगांनी रंगत आणली. सायंकाळच्या सत्रात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद, एआयएसएसएमएस व पुणे विद्यार्थी गृहाचे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या एकांकिका सादर झाल्या. (प्रतिनिधी)
स्पर्धेत ३१ संघांचा सहभाग
स्पर्धेची ही प्राथमिक फेरी दि. २४ फेब्रुवारीपर्यंत रंगणार आहे. मागील वर्षीच्या एकूण स्पर्धेतून १५ संघांची थेट प्राथमिक फेरीसाठी निवड करण्यात आली होती. त्यानुसार यंदाच्या वर्षी या फेरीमध्ये एकूण ३१ संघ सहभागी झाले आहेत. प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी निवडल्या जाणाऱ्या संघांची घोषणा दि. २४ फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर स्पर्धेची अंतिम फेरी २ मार्चला होईल, अशी माहिती स्पर्धेचे संयोजक अंजिक्य कुलकर्णी यांनी दिली.