पुण्यात साकारतेय देशातील पहिली ‘एव्हिएशन गॅलरी’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 07:00 AM2019-09-22T07:00:00+5:302019-09-22T07:00:04+5:30

विमानाच्या इतिहासापासून आजच्या काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंतची सर्व माहिती मॉडेल्ससह पाहता येणार आहे...

First Aviation Gallery in countrey will be opens in Pune | पुण्यात साकारतेय देशातील पहिली ‘एव्हिएशन गॅलरी’

पुण्यात साकारतेय देशातील पहिली ‘एव्हिएशन गॅलरी’

Next
ठळक मुद्देविमान उडविण्याचा घेऊ शकणार अनुभव : गॅलरीचे काम अंतिम टप्प्यात विमानांच्या इतिहासापासून अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा उलगडणार प्रवासहेलिकॉप्टरच्या उड्डाणाचे नेमके विज्ञान काय आहे हे सचित्र

लक्ष्मण मोरे - 

पुणे : देशातील पहिली ‘एव्हिएशन गॅलरी’ शिवाजीनगर येथील शाळेमध्ये आकार घेत असून या गॅलरीमध्ये विमानाच्या इतिहासापासून आजच्या काळातील अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंतची सर्व माहिती मॉडेल्ससह पाहता येणार आहे. यासोबतच जगभरातील लढाऊ विमाने, हवाई परिवहन आणि रोजगाराच्या संधींचीही माहिती याठिकाणी अबालवृद्धांना मिळणार आहे. एवढेच नव्हे तर प्रेक्षक सिम्युलेटरच्या सहाय्याने विमान उडविण्याचा अनुभवही घेऊ शकणार आहेत. चार मजली असलेल्या या गॅलरीचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच ती नागरिकांसाठी खुली केली जाणार आहे. 


हवाई उड्डाणांचा पहिला विचारवंत म्हणून  ‘लिओनार्दो दा विंची’ याने उड्डाणशास्त्राचा अभ्यास करुन हवाई यंत्राची 200 पेक्षा अधिक रेखाचित्रे काढली होती. तसेच हेलिकॉप्टरचे सुद्धा रेखाचित्र 1480 मध्ये रेखाटले होते. परंतू, 19 व्या शतकापर्यंत त्याचे हे साहित्य प्रकाशित होऊ शकले नाही. याचीही माहिती याठिकाणी देण्यात आली आहे. हवेत उडणारा पहिला माणूस म्हणून राईट बंधूंनी विकसीत केलेले विमान, 1783 मध्ये निर्माण करण्यात आलेले हॉट एअर बलून, विज्ञानातील प्रसिद्ध असा बरनॉली सिद्धांत, न्यूटनने मांडलेला तिसरा सिद्धांत याची साहित्यासह माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे. यासोबतच भारतीय हवाई उड्डाणाचे जनक असलेले जेआरडी टाटा यासोबतच पंडीत शिवकर बापूजी तळपदे यांच्याबद्दलची आणि त्यांच्या विमानांबद्दलची रोचक माहिती याठिकाणी देण्यात आलेली आहे. 
यासोबतच एरोफाईल म्हणजे काय, त्याचे प्रकार, विमानाचे किती प्रकारचे पंख असतात, विमान नियंत्रित करणारे भाग कोणकोणते असतात, विमानावर कार्य करणारी बले कोणती, उड्डाणांमागील विज्ञान आणि विमानांचा एकंदर इतिहास याठिकाणी साकारण्यात आला आहे. हवाई परिवहन आणि विमान क्षेत्रातील रोजगाराच्या संधींचीही इत्थंभूत माहिती मिळणार असून फेडरल एव्हिएशनबाबतही मार्गदर्शन लाभणार आहे. विमानतळ कशाला म्हणतात, धावपट्टी काय असते, जगातील लांब धावपट्टी कुठे आहे यासह हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचे नेमके विज्ञान काय आहे हे सचित्र सांगण्यात आले आहे. 
=====

ही गॅलरी तीन मजल्यांची असून प्रत्येक मजल्यावर वेगवेगळ्या विषयांची माहिती मिळणार आहे. पहिल्या मजल्यावर विमानांचा इतिहास, उड्डाणांमागील इतिहास आणि जगभरातील विमानांच्या नावांसह वैशिष्ट्यपूर्ण प्रतिकृती पहायला मिळणार आहेत. तर दुसºया मजल्यावर हेलिकॉप्टरबद्दलची सर्व माहिती, त्याचे उड्डाणामागील विज्ञान, हेलिकॉप्टरच्या जगभरातील विविध जातींच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. तर तिसºया मजल्यावर विमानतळांची माहिती आणि भारतीय वायू सेनेची माहिती, वायू सेनेकडून वापरली जाणारी लढाऊ विमानांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत.
 =====
गॅलरीच्या तळमजल्यावर प्रोजेक्टर रुम करण्यात आली आहे. याठिकाणी आकाशामधून पुणे शहर कसे दिसते याची 20 मिनिटांची व्हिडीओ क्लिप दाखविली जाणार आहे. त्यासाठी ड्रोनमधून पूर्ण पुणे शहराचे चित्रीकरण करण्यात आले आहे. या प्रोजेक्टर रुममध्ये एकावेळी 50 जण बसू शकतात. यासोबतच या तळमजल्यावर वर्कशॉप तयार करण्यात आले आहे. याठिकाणी मुले, अभ्यासक, एव्हिएशन आणि अभियांत्रिकीचे विद्यार्थी बसून विविध प्रकारची विमाने स्वत: तयार करु शकणार आहेत. तशी सुविधा उपलब्ध क रुन दिली जाणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे याठिकाणी  ‘सिम्युलेटर’च्या सहाय्याने नागरिक, विद्यार्थी स्वत: विमान उडविण्याचा अनुभव घेऊ शकणार आहेत. व्हिआर डोळ्यांना लावून प्रत्यक्ष उड्डाणाचा अनुभव घेता येणार असून त्यासाठी 100 प्रकारच्या विमानांचे प्रोग्रॅमिंग करण्यात आले आहे. 
====
महापालिकेने दूरदृष्टीने हा प्रकल्प हाती घेतला आहे. याठिकाणी विमान, हेलिकॉप्टरच्या प्रतिकृती, इतिहास इथपासून अंतराळविरांपर्यंतची सर्व माहिती मिळणार आहे. या प्रकल्पाचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. आम्ही या विषयावर वीस वर्षांपासून गागोवागी जाऊन काम करीत आहोत. या प्रकल्पाचे सल्लागार म्हणून प्रणव चित्ते काम पहात आहेत. देशातील पहिली एव्हिएशन गॅलरी पुण्यात होत असल्याचा आनंद आहे. यामधून मुलांना या क्षेत्रात येण्याची प्रेरणा नक्की मिळेल. 
- नंदकुमार सालके, फ्युचर लाईन एरो सायंटिफिक प्रॉडक्ट्स

Web Title: First Aviation Gallery in countrey will be opens in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.