आधी "तुमच्यामुळेच" चा ठपका आणि आता खाण्यापिण्याचे हाल ; पुण्याच्या पूर्वभागातील नागरिकांची व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 10:53 PM2020-04-24T22:53:27+5:302020-04-24T22:54:15+5:30
पोलिसांनी हाणूनमारून केले बेजार
पुणे: पुण्यात तुमच्यामुळेचा वाढला कोरोना असे आता पूर्वभागातील नागरिकांना सर्वांकडून ऐकून घ्यावे लागत आहे. संपूर्ण परिसर रेडझोन मध्ये टाकल्याने पोलिसांनी आता या भागात दंडुकेशाही सुरू केली आहे. कष्ट करीत रोजचा दिवस कसाबसा काढणाऱ्या या नागरिकांचे आता महिनाभरानंतर मात्र खरोखरच खायचे हाल व्हायला लागले आहेत.
या भागातले बहुतेक लोक गरीब, कष्टकरी वर्गातले आहेत. काही चांगले नोकरदार, जरा बर्या आर्थिक स्थितीतलेही आहेत. त्या सर्वांनाच आता टाळेबंदी, त्यांनतर रेडझोन झाला म्हणूनची आणखी कडक टाळेबंदी, मग दोन दिवस सगळेच एकदम कडक बंद याचा त्रास होतो आहे. वर इतर ठिकाणचे नातेवाईक, ओळखी पाळखीचे यांच्याकडून तुमच्यामुळेच वाढला कोरोना हे चेष्टेत, चिडवायचे, ऊचकावयचे म्हणून का होईना पण ऐकून घ्यावे लागत आहे.
पूर्व भागातले बहुसंख्य गल्लीबोळ बांबू लावून बंद करण्यात आले आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांना मदतीला घेत पोलीस ही तटबंदी करतात आणि नंतर तेच कार्यकर्ते पोलीस असल्याच्या थाटात अरेरावीने वागतात. मासेआळी, मोमीनपूरा, घोरपडी पेठ, टिंबर मार्केट, अशा बहुतेक ठिकाणी गुरूवारी दुपारी व आज शुक्रवारीही हिच स्थिती होती. कोरोना रूग्ण सातत्याने आढळत आहेत त्या भवानीपेठेत तर यापेक्षा अधिक दांडगाईचे वातावरण आहे.
त्यातच आता कष्टकरी वर्गापैकी अनेकांची शिल्लक संपली आहे. घरातून बायको, मोठ्या मुलांकडून पैसे घेऊन तेही संपले आहेत. फुकट मिळणार असलेल्या धान्यावर किंवा मग कोणी काही काम सांगितले तर चोरूनलपून ते करून पैसे मिळतील यावर त्यांची सगळी मदार आहे. दूध, सकाळचा चहा खारी बटर आता विस्मरणात चालला आहे. दुपारची, रात्रीची आणि मग उद्याचीही भूक कशी भागवायची याची चिंता त्यांना भेडसावते आहे. त्याशिवाय कोरोना चा संभाव्य संसर्गही त्यांच्या छातीवर आहेच.
एक प्रसंग...
वेळ गुरुवारी दुपारची... गंजपेठ पोलिस चौकीच्या समोर खुर्च्या टाकून बसलेल्या एका पोलिसाला त्याच्या वॉकीटॉकीवर साहेबांचा राऊंड येत असल्याचा संदेश आला. त़ो त्याने इतरांंना सांगितले. दोघे तिघे लगेच उठले आणि तोपर्यंत समोरच्या फुटपाथवर अगदी कडेला उभ्या असलेल्या गरीब बाप्यावर डाफरले. समोरच्या देवेंद्र मेडिकलमध्ये औषधे घेण्यासाठी म्हणून येत असलेल्या एका मुस्लिम महिलेला, ए चलो, घर जाव, बाद मे आव असे सांगितले गेले. चौकीपासून दूर एका कोपऱ्यात हातगाडीवर दोन म्हातारे सावलीला बसले होते, त्यांच्या अंगावर एकाने काठी ऊगारली व त्यांना हुसकावले.कितीतरी वेळाने साहेबाचा ताफा गाडीतून आला. निर्मनुष्य रस्ता पाहून गाडीतूनच असेच ठेवा रे दिवसभर असा आदेश देत निघून गेला. असाच प्रकार मग खडक पोलिस ठाण्यासमोरही झाला.
...........................
नगरसेवक व राजकीय कार्यकर्ते म्हणजे या भागातील नागरिकांचे तारणहार. पण सुरूवातीच्या औषध फवारणीवर वारेमाप टीका झाल्यावर तेही सगळे गायब झाले आहेत. काँग्रेसचे या भागातील नगरसेवक अजित दरेकर म्हणाले, प्रशासनाने आम्हाला खड्यासारखे बाजूला ठेवले आहे. पण त्यात त्यांची चूक आहे असे वाटत नाही. हा कोरोना चा आजार गर्दी करण्यामुळे फैलावणारा आजार आहे. नागरिकांनी संयम ठेवावा, व प्रशासनाने त्या़चे पोटाचे हाल होणार नाहीत याची काळजी घ्यावी.