महाराष्ट्र राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत पुण्यात होणार; नववर्षाच्या सुरुवातीलाच आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 12:34 PM2021-12-26T12:34:52+5:302021-12-26T13:17:12+5:30
१ जानेवारी २०२२ रोजी बैलगाडा शर्यत आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी-चिंचोडी येथे आयोजित करण्यात आली आहे
मंचर : सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकारी पुणे यांच्या परवानगीने महाराष्ट्र राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे १ जानेवारी २०२२ रोजी आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी-चिंचोडी येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाने सशर्त बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवल्यावर महाराष्ट्र राज्यात सगळीकडे परवानगीसाठी धावाधाव सुरू झाली. आपला अभ्यासू बाणा दाखवून देत माजी खासदार आढळराव पाटील यांनी सर्व अडचणींवर मात करून त्यांचे जन्मगाव असलेल्या लांडेवाडीत बैलगाडा शर्यती सर्वप्रथम भरवण्याचा मान मिळवून दिला. याकामी सरपंच व बैलगाडा मालक ग्रामस्थांची एकी कामी येत सर्वांनी नेटाने जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक कागदपत्रांची तात्काळ पूर्तता केली. त्यामुळेच अतिशय क्लिष्ट समजली जाणारी परवानगी माजी खासदार आढळराव पाटील यांच्या गावाला सर्वात आधी मिळाली.
बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाली असून येथील यात्रा कमिटी सर्व नियमांचे तंतोतंत पालन करणार असून स्पर्धेत भाग घेणाऱ्या बैलगाडा मालकांनी देखील अखंड शर्यती सुरू रहाव्या यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नियमांचे डोळ्यात तेल घालून पालन करावे व आयोजकांना सहकार्य करावे असे आवाहन शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले आहे.