जिल्ह्यातील पहिले बालस्नेही केंद्र मंचरमध्ये सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:10 AM2021-08-01T04:10:25+5:302021-08-01T04:10:25+5:30
मंचर : राज्यातील चौथे व पुणे जिल्ह्यातील पहिले बालस्नेही केंद्र मंचर पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे ...
मंचर : राज्यातील चौथे व पुणे जिल्ह्यातील पहिले बालस्नेही केंद्र मंचर पोलीस ठाण्यात सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंभाते, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, पोलीस निरीक्षक सतीश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे, अर्जुन शिंदे, अर्पणा जाधव, सोमशेखर शेटे, उद्योजक अजय घुले, उपसरपंच सोमनाथ काळे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यातील पहिले बालस्नेही केंद्र मंचर पोलीस ठाण्यात सुरू झाले असून इतरांसाठी ते पथदर्शी आहे. जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यात अशी बालस्नेही केंद्रे सुरू केली जातील, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.
पोलीस अधीक्षक देशमुख म्हणाले, पोलीस ठाण्यात तक्रारदार बरोबर येणारी लहान मुले यांना बसण्यासाठी, खेळण्यासाठी पोलीस ठाण्यात जागा असावी, लहान मुलांना पोलीस ठाण्यात भीतिदायक वातावरण वाटू नये, म्हणून बालस्नेही केंद्र स्थापन करण्यात येते. हे केंद्र उभारण्याची जबाबदारी शासन किंवा एनजीओ संस्थांची असते. मंचर येथे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी शासन किंवा एनजीओ यांची वाट न पाहता लोकसहभागातून केंद्र निर्माण केले, हे त्यांचे काम कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रात यापूर्वी फक्त तीन ठिकाणीच ही केंद्रे सुरू झाली आहेत. पुणे जिल्ह्यात हे पहिलेच बालस्नेही केंद्र असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
हे केंद्र बनविण्यासाठी दीपक चौरे, कलाशिक्षक संतोष चव्हाण यांचे विशेषत: देशमुख यांनी कौतुक केले. केंद्रामध्ये लहान मुलांसाठी खेळणी, पाळणा, गोष्टीची पुस्तके लहान मुलांना उपयुक्त असे केंद्र बनविण्यात आले आहे. बालस्नेही केंद्रातील चित्रकलेचे त्यांनी विशेष कौतुक केले. मंचर येथील बालस्नेही केंद्र इतरांसाठी पथदर्शी आहे. अशी केंद्रे पुणे जिल्ह्यात पोलीस ठाण्यांमध्ये सुरू केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली. पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांनी प्रास्ताविक केले. अमित कातळे यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल लंबाते यांनी मानले.
फोटो