राज्यातील पहिले कोविड रुग्णालय पुण्यात, वाचा उभारणीबद्दल सविस्तर माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 04:16 PM2020-03-25T16:16:14+5:302020-03-25T16:22:05+5:30
नुकत्याच झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत कोविड रुग्णालयावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काही दिवसात कोरोना बाधित हजारो रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी काही दिवसात करणार आली.
राजानंद मोरे
पुणे ; कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असली तरी सध्या नायडू रुग्णालयासह अन्य खासगी रुग्णालयामध्ये पुरेशा बेड उपलब्ध आहेत. पण पुढे ही संख्या वाढत गेल्यास त्यांच्यावर एकाच ठिकाणी उपचार व्हावेत यासाठी ससून रुग्णालयाच्या ११ मजली नवीन इमारतीला 'कोविड १९' रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
हे चीन मॉडेल असून राज्यातील पाहिले कोविड रुग्णालय असणार आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या बैठकीत कोविड रुग्णालयावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर काही दिवसात कोरोना बाधित हजारो रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची उभारणी काही दिवसात करणार आली. एकाच ठिकाणी अनेक रुग्णांवर उपचार झाल्यास आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी कमी होतो. तसेच विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्यास त्या प्रत्येक रुग्णालयातील त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका, अन्य कर्मचारी बाधित होण्याचा आकडा वाढू शकतो. तसेच एकाच ठिकाणी सर्व रुग्ण असल्यास समन्वय ठेवणेही सहज शक्य होते. हे चीन मॉडेल राज्यात पहिल्यांदा पुण्यात राबविले जाणार आहे.
यासाठी ससून रुग्णालयाच्या आवारातील नवीन ११ मजली इमारतीची निवड करण्यात आल्याचे समजते. नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले असले तरी अद्याप पायाभूत सुविधा नाहीत. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. सुमारे ५० बेडच्या अतिदक्षता विभागाची उभारणी केली जाणार आहे. तसेच ७०० हुन अधिक विलगीकरण बेड असतील. रुग्ण संख्या वेगाने वाढल्यास ३१ मार्च पासूनच बाधित रुग्ण या रुग्णालयात दाखल करण्यास सुरुवात होऊ शकते. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षित मनुष्यबळ लागणार आहे. खासगी तसेच अन्य शासकीय रुग्णालयाची त्यासाठी मदत घेतली जाणार आहे. तेथील डॉक्टर्स, परिचारिका व अन्य कर्मचाऱ्यांना कोविड रुग्णालयात काम करावे लागू शकते. त्यासाठी लागणारे व्हेंटिलेटर्स, पीपीई किट्सही त्यांना उपलब्ध करून घ्यावे लागणार आहेत.
- डॉ. अजय चंदनवाले, अधिष्ठाता, ससून रुग्णालय :
"कोविड रुग्णालयाबाबत चर्चा झाली आहे. अद्याप अंतिम निर्णय नाही. पण त्यादृष्टीने आमची तयारी सुरू आहे. शासन आदेशानुसार सर्व यंत्रणा सज्ज केल्या जातील."