पुण्यात तिहेरी तलाकप्रकरणी पहिला गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 09:15 PM2019-11-05T21:15:12+5:302019-11-06T18:26:11+5:30
केंद्र सरकारने तिहेरी तलाकविरोधात कायदा केल्यानंतर पुण्यातील पहिला गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
पुणे : केंद्र सरकारने तिहेरी तलाकविरोधात कायदा केल्यानंतर पुण्यातील पहिला गुन्हा हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पतीने पत्नीला नोटीस पाठवून त्यामध्ये तीन वेळा तलाक तलाक तलाक असा उल्लेख केला होता. याप्रकरणी मांजरी येथे राहणा-या २९ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली असून, हडपसर पोलिसांनी जावेद नासीर शेख (रा. गुलमोहर कॉलनी, हडपसर स्टेशनजवळ, मुंढवा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी महिलेचा जावेदबरोबर जानेवारी २०१८ मध्ये विवाह झाला होता. तिने पती व सासरच्या लोकांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचारअंतर्गत हडपसर पोलीस ठाण्यात सप्टेंबर २०१८ मध्ये तक्रार केली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. या तक्रारीनंतर फिर्यादी मांजरी येथे माहेरी रहात आहे. जावेद हा अमेनोरा येथे खासगी कंपनीत स्टोअर मॅनेजर आहे.
जावेद शेख याने ९ ऑक्टोबर रोजी तिला एक नोटीस पाठविली. त्यात मै जावेद नासीर शेख तुमको तलाक देता हू असा तीन वेळा उच्चार करून विवाह संपुष्टात आणला आहे. हडपसर पोलिसांनी अॅवॉलिशन ऑफ ट्रिपल तलाक अंडर द मुस्लिम वूमन प्रोटेक्शन ऑफ मँरेज अॅक्ट २०१९ च्या कलम ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे अधिक तपास करीत आहे.