दलित कलावंतांचा अमेरिकेत होणार जागर!, २३-२४ फेब्रुवारीला पहिला दलित चित्रपट महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2019 12:26 AM2019-02-11T00:26:03+5:302019-02-11T00:26:20+5:30
जगण्याचे तत्त्वज्ञान मांडत आयुष्याची चित्तरकथा रचणाऱ्या दलित साहित्यिकांनी अवघ्या महाराष्ट्रात एक धगधगते वास्तव कथा, कविता, कादंब-या, आत्मचरित्र यातून मांडले होते. त्याच साहित्याचा आणि कलेचा जागर जागतिक पातळीवर पोचला आहे.
- धनाजी कांबळे
पुणे : जगण्याचे तत्त्वज्ञान मांडत आयुष्याची चित्तरकथा रचणाऱ्या दलित साहित्यिकांनी अवघ्या महाराष्ट्रात एक धगधगते वास्तव कथा, कविता, कादंब-या, आत्मचरित्र यातून मांडले होते. त्याच साहित्याचा आणि कलेचा जागर जागतिक पातळीवर पोचला आहे. येत्या २३ आणि २४ तारखेला न्यूयॉर्कमध्ये दलित कलावंतांच्या झंझावात पहिल्या दलित चित्रपट आणि सांस्कृतिक महोत्सवात पाहायला मिळणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल मिशन, आंबेडकर असोसिएशन आॅफ नॉर्थ अमेरिका, बोस्टन स्टडी ग्रुप, आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, आंबेडकर बुद्धीस्ट असोसिएशन यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कोलंबिया विद्यापीठाचा वारसा हा उदारमतवादी विचारांचा आहे. याच विद्यापीठाच्या वैचारिक मानवतावादी व पुरोगामी संस्कृतीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची वैचारिक जडणघडण झाली. तोच वैचारिक वारसा घेवून
हा महोत्सव कोलंबिया विद्यापीठ व द न्यू स्कूल, न्यूयॉर्क इथे होणार आहे, अशी माहिती सुरज ऐंगडे यांनी दिली.
भारतातल्या दबलेल्या दलित समूहाचे जगणे, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सर्व पातळ्यांवर द्यावा लागणारा लढा, हे कलेच्या माध्यमातून जगासमोर आणले जाणार आहे. भारतीय व दक्षिण आशियातील मुख्य प्रवाहाशी सवांद प्रस्थापित करणे, त्याचप्रमाणे या समाजातील वैविध्य चित्रपटाच्या माध्यमातून मांडले जाईल. चित्रपटांबरोबरच यात माहितीपटांचाही समावेश आहे. दलित निर्माते आणि दिग्दर्शक यांनी दलित जीवन, त्याच्या जाणिवा, त्यातील त्यांचा वर्गलढा, जातसंघर्ष समोर ठेवून तयार केलेल्या चित्रपटांचा यात समावेश आहे.
या महोत्सवात चित्रपटासह दलित कलावंतांनी निर्माण केलेली फाईन आर्ट, त्यांनी काढलेले फोटो, साहित्य ज्यामध्ये दलितांच्या जगण्यातील दाहकता, त्यांच्या आत्मसन्मानासाठी धरलेला आग्रह दाखवण्यात येणार आहे.
नागराज मंजुळे यांच्यासह जाणकारांची उपस्थिती
चित्रपट सृष्टीत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविलेला आहे, अशा दलित कलावंतांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन केले जाणार आहे. त्यामध्ये प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक पा. रणजित, नागराज मंजुळे, अभिनेत्री निहरिका सिंग, डॉ. डेविड ब्लान्डेल, बोमकु मुरली, जयन चेरियन, सुबोध नागदिवे, रामपिला राव, तसेच चित्रपट व इतर माध्यमातील जाणकार उपस्थित राहणार आहेत.