१८ वर्षांच्या वरील नागरिकांच्या लसीकरणाचा पहिला दिवस गोंधळाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 01:00 PM2021-05-01T13:00:57+5:302021-05-01T13:02:07+5:30
तुटवड्यामुळे मोठा फटका.केंद्रांवर नागरिकांची गर्दी
लसींच्या तुटवड्याचा मोठा फटका सध्या राज्याला बसतो आहे. आज लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी अनेक केंद्रावर त्याचा प्रत्यय आला. गर्दी आणि गोंधळ इतका की ही लसीकरण केंद्राच कोरोना प्रसाराचे हॅाटस्पॅाट बनतील का काय अशी भिती नागरिकांनी व्यक्त केली. त्यातच खासगी रुग्णालयांनी आजपासून लसीकरण बंद केल्याने या गोंधळात भरच पडलीये.
पुण्यातल्या कमला नेहरु रुग्णालयात अनेक नागरिक अक्षरश: सकाळी सहा पासुन केंद्रावर दाखल झाले होते .पण नोंदणी झालेल्या ३५० जणांच्या नावांची यादी केंद्रावर लावली गेली आणि अनेक तास रांगेत थांबलेल्या नागरिकांच्या रागाचा उद्रेक झाला. अनेकांनी थेट केंद्रावरच्या कर्मचाऱ्यांशीच वाद घातला. आम्हांला नोंदणीत केंद्र मिळत नाही आणि त्यातच पुन्हा केंद्रावरुनही परत का पाठवता असा सवाल नागरिक विचारत होते. आता तरी लसीकरण होईल अशा आशेनी आलेल्या तरुणांची यात मोठी संख्या होती. यातलाच विरेंद्र निफळ म्हणाला “ २८ तारखेपासुन नोंदणी करण्याचा प्रयत्न करत होतो. आता केंद्र मिळत नाही. आम्ही फक्त लॅाकडाउन सहन करायचा का ? “
प्रणव शिंदे हा दुसरा तरुण नागरिक म्हणाला “ मी २८ तारखेलाच नोंदणी केली आहे. पण स्लॅाट मिळत नाहीये. कुठे चौकशी करण्याचा पण मार्ग नाही. शेवटी लसीकरण केंद्रावर आलो.”
महापालिकेने कालच पत्रक काढत १८-४४ वर्षांच्या व्यक्तींचे लसीकरण करणार असल्याचे जाहीर केले होते. २ केंद्रावर हे लसीकरण सुरु राहणार असुन इतकं सगळी केंद्र बंद रहातील असंही जाहीर केलं होतंं त्यातच आता खासगी रुग्णालयांना लस दिली जाणार नाही असं जाहीर केल्याने खासगी रुग्णालयांनीही लसीकरण बंद करायचं ठरवलं आहे. एकुणच १८ ते ४४ काय किंवा ४५ त्या वरच्या नागरिकांचे काय लसीकरणासाठी प्रत्येकालाच वाट बघावी लागणार हे आता स्पष्ट झालंय.