Omicron Variant: पिंपरीत ओमायक्रॉनचा पहिला मृत्यू; दिवसभरात नव्या तीन रुग्णांची भर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2021 10:14 PM2021-12-30T22:14:58+5:302021-12-30T22:15:10+5:30
शहरातील तीन जणांचा ओमायक्रॉन तपासणी अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे
पिंपरी : शहरातील आणखी तीन जणांचा ओमायक्रॉन तपासणी अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. यात दोन महिला, तर एका पुरुषाचा समावेश आहे. या तिघांपैकी नायजेरियातून आलेल्या ५२ वर्षीय रुग्णाचा २८ डिसेंबरला हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला. त्याचा ओमायक्रॉनचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात ओमायक्रॉनचा पहिला मृत्यू झाला आहे.
संबंधित रुग्णास २८ डिसेंबरला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रुबी अलकेअर कार्डियाक सेंटर येथे हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, त्यांचा ओमायक्रॉन तपासणी अहवाल गुरुवारी पुण्यातील एनआयव्हीने पॉझिटिव्ह दिला आहे. या व्यक्तीस ओमायक्रॉनची प्रासंगिक लक्षणे असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. पुणे जिल्ह्यात ओमायक्रॉनमुळे मृत्यू झालेली ही पहिली घटना आहे.
हा रुग्ण नायजेरियातून आला होता. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर त्याच्यावर पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. त्याला १३ वर्षांपासून मधुमेहाचा त्रास होता, असे राज्याच्या साथरोग विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.