Pune: टाके न घालता हृदयाची बदलली झडप; पुण्यातील डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 01:45 PM2023-06-15T13:45:20+5:302023-06-15T14:08:44+5:30
आधुनिक शस्त्रक्रियेचा प्रयोग पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वी करून वैद्यकीय क्षेत्राला नवा आयाम दिला...
- पांडुरंग मरगजे
धनकवडी (पुणे) : ट्रान्सकॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (टीएव्हीआय) हा आधुनिक शस्त्रक्रियेचा प्रयोग पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वी करून वैद्यकीय क्षेत्राला नवा आयाम दिला. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील सत्तरी पार केलेले निवृत्त प्राचार्य दिलीप रेवडकर यांना तीन महिन्यांपासून चालताना दम लागणे, चक्कर येऊन भोवळ येणे, छातीमध्ये दुखण्याचा त्रास होत होता. बार्शीमध्ये हृदयरोगतज्ज्ञांना दाखवल्यानंतर त्यांना एओर्टिक स्टेनोसिस हा आजार असल्याचे निदर्शनास आले. रेवडकर यांचा मुलगा डॉ युवराज यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ओंकार थोपटे यांच्याशी रुग्णांची लक्षणे आणि दोन डी इको यांची माहिती दिली.
माहिती मिळताच क्षणाचा डॉ. थोपटे यांनी ट्रान्स कॅथेटर एओर्टिक व्हॉल्व्ह इम्प्लांटेशन (टीएव्हीआय) शस्त्रक्रियेची माहिती दिली. कात्रज येथील हार्टबिट फाउंडेशनमध्ये रुग्णांची पुनर्तपासणी करून शस्त्रक्रिया करता येईल की नाही याची खात्री करून कार्डियाक सीटी स्कॅन विथ टीएव्हीआय (TAVI ) प्रोटोकॉल सह्याद्री हॉस्पिटलमध्ये करून घेऊन टीएव्हीआय शस्त्रक्रियेची वेळ निश्चित केली.
टीएव्हीआय शस्त्रक्रिया रोगग्रस्त महाधमनी (एओर्टिक) व्हॉल्व्ह रोपण करण्यासाठी केली जाते. ही आधुनिक व्हॉल्व्ह रिप्लेसमेंटची विनाटाक्यांची शस्त्रक्रिया आहे. यामध्ये ओपन हार्ट सर्जरी करायची आवश्यकता नसते. रुग्णाच्या मांडीमध्ये सुई टाकून कॅथेटरच्या साहाय्याने रक्तवाहिनीद्वारे खराब झडोच्या जागेवर कृत्रिम झडप बसवली जाते. यामध्ये कोणत्याही भुलीची गरज नसून रुग्णासोबत चालतबोलता सहजतेने डॉ. थोपटे यांनी डॉ. अनमोल सोनावणे यांच्या मदतीने विनाटाक्याची टीएव्हीआयची शस्त्रक्रिया सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये केली.
एक आठवड्यानंतर झालेल्या पहिल्या फॉलोअपमध्ये पेशंटच्या मुलीने डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी डॉ. थोपटे यांच्यामुळे इतकी मोठी शस्त्रक्रिया किती सहजतेने आणि कोणत्याही कॉम्प्लिकेशनविरहित झाली असून, पेशंट शस्त्रक्रियेच्या दुसऱ्या दिवसापासून कशा प्रकारे चालत फिरत आहे याबद्दल डॉ. थोपटे यांचे कौतुक व आभार व्यक्त केले.
वैद्यकीय शास्त्राच्या इतिहासात हा माइल स्टोन असून, गुंतागुंतीच्या ओपन हार्ट शस्त्रक्रियेला डॉ. ओंकार थोपटे यांच्यामुळे टीएव्हीआय हा पर्याय मिळाला असून, पुणे व आसपासच्या परिसरात अशा प्रकारची सेवा देणे आम्हाला शक्य झाले आहे.
- डॉ. अभिजित पळशीकर, संचालक, सह्याद्री हॉस्पिटल